Maratha Reservation News : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील हे तळपत्या उन्हात उपोषणाला बसले आहेत. 43 अंश तापमानात शेतात एका बाजेवर संतरजी टाकून जरांगे पाटील बसले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्यने अंतरवालीत दाखल झाले आहेत. अनेक आंदोलकांनी शर्ट काढून उन्हात बसत जरांगे यांना समर्थन दर्शवले. तर महिला, लहान मुलेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांची प्रकृती उन्हामुळे बिघडू लागली आहे. तसा आंदोलकांचा संयम सुटू लागला आहे. आंदोलना दरम्यान, पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका महिलेला भोवळ आल्याने तिला तातडीने अॅम्ब्युलन्सने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी दहापासून उपोषणाला सुरूवात झाली. त्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना सावलीत बसण्याचे आवाहन केले. मात्र ते नाकारत जरांगे हे उन्हातच बसले.
दुपारी ऊन तापल्याने जरांगे पाटील यांना प्रचंड त्रास जाणवू लागला. उपस्थित आंदोलकांना हे सहन न झाल्याने त्यांनी थेट समृद्धी महामार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. तर दुपारी साडेचारच्या सुमारास सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न काही आंदोलकांनी केला. पोलीसांनी आंदोलकांना बाजूला करत वाहतूकीला वाट करून दिली. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी रास्ता रोको आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले.
तज्ञांना निमंत्रण, पुन्हा विखे, लाड येणार!
दरम्यान, सकाळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने काही मसुदा देण्यात आला होता. तो मान्य असेल तर त्यासंदर्भात अध्यादेश काढण्याची तयारी सरकारने दाखवली होती. परंतु पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील मराठा आरक्षणाचे तज्ञ, अभ्यासकांना अंतरवालीत सायंकाळी पाचपर्यंत येण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आपण पुढील दिशा ठरवू असे जरांगे पाटील यांनी त्यांना सांगितले.
दरम्यान, मुंबईकडे निघालेले भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवालीत जा, असा निरोप दिल्यामुळे ते पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण तज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा झाल्यानंतर विखे पाटील, प्रसाद लाड हे पुन्हा अंतरवाली सराटीत जाणार आहेत. त्यानंतर सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांचे एकमत झाले तर उपोषण थांबवले जाऊ शकते, असे बोलले जाते. अंतरवालीमध्ये जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.