Maratha Reservation : मराठा समाजाने वारंवार आपल्या न्याय, हक्कासाठी आंदोलन करायचे, सरकारने ते हलक्यात घ्यायचे, हे आता खपवून घेणार नाही. मराठा समाजाचा अवमान करणार्यांना आम्ही 2029 मध्ये पाडू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दिला आहे. आम्हाला आणि आमच्या आंदोलनाला सरकार हलक्यात घेत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटलांना पुढचा काळ जड जाईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या, कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप, हैदराबाद गॅझेटनूसार नोंदी आणि प्रमाणपत्र यासह इतर मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात उपोषण केले. सरकारने तात्काळ या आंदोलनाची दखल घेतली. 12 मुद्यांच्या मसुद्यावर निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली. सरकारच्या या निर्णयानंतर सरकार मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर झुकले, अशी टीका ओबीसी आंदोलकांकडून केली गेली.
मराठा समाजाच्या विद्यार्थांना ओबीसींना लागू असलेल्या सवलती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारविरोधात ओबीसींमध्ये मोठी नाराजी आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारकडून अंमलबजावणीच्या बाबतीत होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ''सरकार वारंवार भुलवत राहणार असेल तर हे चालणार नाही. मराठा समाजाचा अवमान वारंवार होतोय. 2029 ला मराठा समाजाचा अवमान करणाऱ्याला पाडेल,'' असा इशाराच त्यांनी दिला.
''मराठा समाजाचे आरक्षण हक्काचे असताना ते दिले जात नाही. हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी आहेत, तरी देखील कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही, तर मग राग येणारच. तुम्ही कुणाला भिऊन हे करता आहात?'' असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. आम्ही ओबीसींचे आरक्षण काढून आम्हाला द्या, असे म्हणत नाही. आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत. बीडच्या वडवणी तालुक्यात नोंदी सापडल्या. मात्र तेथील तहसीलदारांनी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी या नोंदी उडविल्या आहेत. नोंदी उडविण्याचा अधिकार कोणी दिला?'' असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील आक्रमक झाले.
ओबीसी समाजाला आमचे म्हणणे कळत नाही. ओबीसी आणि मराठा समाजात दरी निर्माण का केली जाते, हे माहीत नाही. परंतु स्वत:ला तज्ञ म्हणून घेणाऱ्यांना हे का कळत नाही? आम्ही ओबीसीतून मागत नाही. नोंदी असतील तर आरक्षण द्यायला हरकत काय? आंदोलनादरम्यान अंतरवली सराटीहून परतताना अपघात झालेल्या मराठा सेवकाची बीड मधील रुग्णालयात आज मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.