Manoj Jarange Patil, Ashok Chavhan Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation: अशोक चव्हाणांचा अंदाज चुकला, मराठा आंदोलकांचा राग कायम...

Jagdish Pansare

Ashok Chavhan News: भाजपचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आठवडाभरापूर्वी मध्यरात्री मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटीत जाऊन भेटले होते. अत्यंत गुप्तपणे त्यांची ही भेट झाली होती. या भेटीत जरांगे पाटील यांच्याशी चव्हाण यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सविस्तर चर्चा केली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील एका कार्यकर्ता प्रवेश सोहळ्यात अशोक चव्हाण यांनी आपल्याला मराठा समाजाचा कुठेही विरोध नाही, मला कुणी अडवले नाही, मी सगळीकडे फिरतोय असे सांगितले होते. पण आठवडाभरातच त्यांचा हा दावा फोल ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

कारण आज अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना त्यांच्याच नांदेड जिल्ह्यात (Nanded) मराठा समाजाच्या संतापाला तोंड द्यावे लागले. कोंढा गावात भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी जात असतांना संतप्त तरुणांनी मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी त्यांनी चव्हाण यांची गाडी अडवली. पोलिसांनी हस्तक्षेप केला, पण तरुणांचा रोष आणि आक्रमक पवित्रा पाहून अशोक चव्हाणांनी समयसूचकता दाखवत तिथून निघून जाणे पसंत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या निर्णायक बैठकीत लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करण्याचे जाहीर केले. शिवाय कुठल्याही अपक्षाला मराठा समाज पाठिंबा देणार नाही, अशीही भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीत ज्याला पाडायचे त्याला पाडा, असा सूचक संदेशही दिला. त्यानंतर मराठा समाज नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला समोर जावे लागले.

21 मार्च रोजी उमरी येथील एका कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्याशी झालेली भेट आणि मराठा आरक्षणावर झालेल्या चर्चेचा उल्लेख केला होता. मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेला वाद सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच सुटू शकेल, असे आपण मनोज जरांगे यांना बाेलल्याचे चव्हाण यांनी सांगितले होते. मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेट ही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून किंवा माजी मुख्यमंत्री म्हणून घेतली नव्हती, तर समाजाचा प्रतिनिधी या नात्याने घेतल्याचं सांगितलं होतं.

शिवाय जिल्ह्यात आपल्याला कुठेही मराठा समाजाचा विरोध नसल्याचे चव्हाण या मेळाव्यात म्हणाले होते. त्यांच्या या दाव्याला आठवडा उलटत नाही, तोच त्यांच्याच नांदेड जिल्ह्यातील कोंढा गावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना माघारी पाठवले. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील-चिखलीकर (Prataprao Patil-Chikhlikar) यांच्या प्रचारासाठी कोंढा गावात मतदारांच्या भेटी-गाठीसाठी ते आले होते. या वेळी त्यांना काही मराठा बांधवांनी अडवलं.

गावात पोहाेचताच एकत्रित जमलेल्या गावकऱ्यांनी अशोक चव्हाणांना विरोध केला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी असल्याचे सांगत जोरदार घोषणाबाजीही केली. संतप्त तरुणांनी थेट चव्हाणांची कार अडवत घेरावच घातला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत तरुणांना बाजूला केले, पण आंदोलकांचा पावित्रा पाहून चव्हाण माघारी फिरले.

चव्हाणांवर राग का?

अशोक चव्हाण हे राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष होते. परंतु या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी स्वतः चव्हाण आणि त्यांच्या सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. तेव्हा अशोक चव्हाण सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवून आपली सुटका करून घेत होते.

परंतु महाविकास आघाडी सरकार (MVA) सत्तेवरून पाय उतार झाल्यावर मात्र अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका बदलली. त्यामुळे मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल रोष असल्याचे बोलले जाते. मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर आपल्याबद्दलचा समाजामध्ये असलेला राग कमी झाला असेल, असा चव्हाण यांचा अंदाज होता. परंतु आज नांदेडमध्येच त्यांना विरोध झाल्यानंतर त्यांचा अंदाज चुकला असल्याचं बोललं जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT