Navnath Waghmare Statement Sarkarnama
मराठवाडा

Navnath Waghmare : मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मॅनेज, मोठ्या डिलनंतर ते गुंडाळले; ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा गंभीर आरोप!

Maratha Protest: मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे २० दिवसांचे उपोषण स्थगित करून सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली. यावर नवनाथ वाघमारे यांनी आंदोलन मॅनेज केल्याचा आरोप केला.

Jagdish Pansare

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे सुरू केलेले १९-२० दिवसांचे आंदोलन पहाटे समाज झोपेत असताना संपवल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. हे आंदोलन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणाच्या चौथ्या दिवशी दिलेल्या मसुद्यावरच मॅनेज केले, त्यांना मानावेच लागेल, असा दावाही वाघमारे यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेतले. सरकारला तीन महिन्यांची मुदत देत यानंतर उपोषण नाही तर थेट मुंबईत धडकणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांच्या उपोषण मागे घेण्याच्या निर्णयावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी यावर भाष्य करणारा सविस्तर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. जरांगे पाटील यांचे हे आंदोलन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मॅनेज करत गुंडाळले, असा आरोप त्यांनी केला आहे. मराठा समाज झोपेत असताना सकाळी साडे पाच-सहा वाजता म्हणजेच राम प्रहरात राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाटोद्यात जाऊन मॅनेज करून हे आंदोलन संपवले आहे.

उपोषणाच्या चौथ्या दिवशी जो मसुदा दिला होता, त्याच मसुद्यावर बोळवण करून आंदोलन मागे घ्यायला लावले. जरांगे पाटील यांनी 'मुंबईला जाणार, शेवटचं आणि निर्णायक आंदोलन' म्हणून वल्गना केली होती. पण प्रत्यक्षात प्रत्येक वेळी शेवटचं म्हणून माघार घेतली. वाशीला जाऊन परत आला, आझाद मैदानावर 'जिंकलो रे राजा' म्हटले, आणि आता पुन्हा माघार घेतली.

सलाईन घेऊन कसले उपोषण?

यातून मराठा समाजाला काहीही मिळणार नाही. यामध्ये मनोज जरांगे आणि विखे पाटील जिंकले, मराठा समाज हरला, अशी टीका वाघमारे यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणच सुरू नव्हते. उपोषणात असताना ६-७ वेळा सलाईन घेतले होते. सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. काजू-बदाम खाऊन उपोषण करण्याचा हा प्रकार होता.

एक दिवस दीड तास मीडियासमोर बोलायचे आणि दुसऱ्या दिवशी पांघरुण घेऊन नाटक करायचे. अंतरवालीतून निघताना 'कोणी कोणाचं नसतं' म्हणत रडून दाखवण्याची कला, वाकडा-तिकडा होणे, आणि गेवराईत पोहोचताच ताठ बसून गाडीत बसणे, पाणी पिऊन गुळण्या फेकणे ही सर्व नौटंकी होती, असा आरोपही वाघमारे यांनी केला.

मुंबईला जायची भीती वाटू लागली होती म्हणून जरांगे यांनी माघार घेतली. जरांगे यांना कोणी कोरा कागद दिला असता तरी त्याने उपोषण सोडले असते, अशा शब्दात वाघमारे यांनी त्यांची खिल्ली उडवली. समाज झोपेत असताना पहाटे आंदोलन मागे घेतले, उपोषण सोडले म्हणजे १०० टक्के मोठी डील झाली आहे, असा आम्हाला संशय आहे.

आधी भुजबळ साहेबांना, मुख्यमंत्र्यांना शिव्या देणे चालत होते, पण जेव्हा मराठा समाजाच्या मंत्र्यांनाच शिव्या दिल्या तेव्हा कोणीही जवळ राहिले नाही. त्यामुळे हे आंदोलन मोडीत निघाले, असा दावा वाघमारे या व्हिडिओमध्ये करतात. यापुढे मराठा समाजाने या 'डील करणाऱ्या आणि सलाईन योद्ध्यावर' विश्वास ठेवू नये, असा खोचक टोलाही वाघमारे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT