

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारा ध्वजारोहण कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अलर्ट झाले असून, इशारा देणाऱ्या आंदोलकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कार्यक्रमादरम्यान कोणी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच ध्वजारोहण कार्यक्रमासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बिघडत चाललेल्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. गजाननाला जरांगेंना लवकर बरे करावे अशी प्रार्थना केली. जरांगे-पाटील यांनी उपोषण थांबवून तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे, असं आवाहनही भुजबळ यांनी केलं.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सव सुरू आहे. मोठा उत्साह असतो आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. अशा परिस्थितीत आंदोलनाचा निर्णय जरांगे यांनी घेऊ नये. गणेशोत्सवाच्या काळात तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही भूमिका त्यांनी घेऊ नये. अनेक दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत आहे. त्यांनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले पाहिजेत, असे आमचे मत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर पुण्यात मोठं भाष्य केलं. ते म्हणाले, सरकारने जरांगे यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या आहेत. एका मागणीसंदर्भात कायदेशीर अडचण असल्याचं त्यांना सांगितलं आहे. राज्य सरकारने नेहमीच चर्चा केली आहे आणि आजही आम्ही त्यांच्यासाठी चर्चेची दारे खुली ठेवली आहेत. जरांगेंच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. उपोषण नंतरही करता येईल.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी मराठा समाजातील नवं आवाहन केलं आहे की, मराठा समाज बांधवांनी घाई करुन नये. श्रीगोंदा, हडपसर, पुणे, येथून जे मराठे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत, त्यांनी आपण तारीख जाहीर करेपर्यंत मुंबईला निघू नये. त्यांनी घरी परत जावं. आपण जर आधीच तारीख जाहीर केली, तर सरकार यात आडकाठी आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लागलीच तारीख जाहीर करणार नाही, असे जरांगेंनी म्हटलं आहे.
महायुती सरकारची मराठा आरक्षणाबद्दल भूमिका सकारात्मक आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत जे निर्णय झाले ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाले. यापूर्वी मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते. परंतु त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला नाही किंवा शब्द काढला नाही. हैदराबाद गॅजेट संदर्भात फडणवीस यांनी निर्णय घेतला. कोर्टात हा निर्णय टिकून दाखवला. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी आरक्षण दिले होते, ते आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही . त्यांना टिकवायचं नव्हते, अशी टीका मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत बिघडल्यानंतरही आक्रमक भूमिका घेतली आहे. नगरमध्ये डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. मला आज जाता आले नाही, त्यामुळे गुरुवारी उद्या दुपारी 1 वाजता मुंबईकडे निघणार आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मी मेलो तरी हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला. सरकारचा ड्राफ्ट वाचल्यानंतर मराठ्यांना महत्वाचा संदेश देईल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चिती करुन वाटचाल करावी, परिश्रमाची तयारी करुन कठोर मेहनत केल्यास यश सहजतेने साध्य होते, बारामतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी (एफ.वाय. बी.ई.) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
UPI पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या चर्चेमुळे आता व्यापारी वर्गाकडून विरोध सुरू झाला आहे. दोन हजार रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर 0.4 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय झाल्यास, त्याचा थेट परिणाम व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर होईल, असा दावा राज्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपेन अग्रवाल यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांच्याकडून युक्तिवाद केला जात आहे. मंगळवारीही कौल यांनी युक्तिवाद केला होता.
मनोज जरांगे पाटील यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी सलाईन लावून घेतले आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.
गणेशोत्सव संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय घ्यावा, असं आवाहन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. जरांगे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे गणेशोत्सवानंतर जरांगे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने होत असलेल्या बदलामुळे डॉक्टरांच्या पथकाने तातडीने तपासणी केली. तपासणीत त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी आणि रक्तदाब दोन्ही लक्षणीयरीत्या कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बीडमधील पाटोद्यात मुक्कामी असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा बीपी आणि शुगर लेव्हल कमी झाली आहे. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. दरम्यान, आज ते पाटोद्यातून अहिल्यानगरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यावरून टोला लगावला आहे. जरांगेंचा मोठा ताफा पाहून ते लढाईला निघाल्यासारखे वाटत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मनोज जरांगे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी त्यांची भेट घेतली. प्रकृतीची काळजी घेत वैद्यकीय उपचार घ्यावेत, अशी विनंती महंतांनी जरांगेंना केली. मात्र, जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार नसून उपचार न घेण्याच्या भूमिकेवर अद्याप ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
कॅपिटल सिटी को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सभेत हाऊसकीपिंगच्या थकीत बिलावरून वाद झाला. याचवेळी वकिलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे मारहाण करण्यामध्ये निघोजे गावच्या सरपंच महिलेचे पती सहभागी असल्याने हाणामारीची चर्चा आहे.
तासगाव संस्थानच्या गणपती रथोत्सवादरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांच्या पायाला दुखापत झाली आहे. रथातून खाली उतरत असताना गर्दीत त्यांचा पाय चिरडला गेल्याची माहिती आहे. दुखापतीनंतर शंभूराज देसाई तातडीने उपचारासाठी कराडला आले आहेत. तेथून ते पाटण तालुक्यातील मरळी दौलतनगर येथे नियोजित भेटीगाटीसाठी जाणार आहेत.
मनोज जरांगे पाटील हे बीडच्या पाटोद्यामध्ये मुक्कामी आहेत, त्यांचा पहिला मुक्काम पाटोद्यात होता. जरांगे पाटलांचा मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. तत्पूर्वी विशेष पोलिस पथकाकडून मनोज जरांगे पाटील हे वापरत असलेल्या डिफेंडर गाडीची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या वाहनाची देखील तपासणी करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली आहे, काल रात्री ते पटोद्यात मुक्कामी होते. आज ते अहिल्यानगरकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, त्यांनी उपचार घ्यावेत अशी विनंती करण्यात आली. मात्र, उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला.
अशोक खरात याने जामीनासाठी अर्ज केला आहे. सध्या एसआयटीचा तपास पूर्ण झाल्याने जामीन मिळावा अशी मागणी त्याने नाशिकच्या न्यायालयात केली आहे. या संदर्भात सरकारी वकिलांकडून यापूर्वीच जामीनाला विरोध झाला आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २०२५-२६च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी अदा करण्यासाठी तसेच आगामी २०२६-२७च्या गाळप हंगामाची पूर्वतयारी करण्यासाठी कारखान्यांना सुलभ अटींवर ‘सॉफ्ट लोन’ देण्यात येणार आहे. या कर्जावरील व्याजासाठी सरकारकडून ७३४ कोटी रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
'उपोषणात दौरा चांगला नाही. आरक्षण महत्त्वाचे आहे, दौरा महत्त्वाचा नाही. खोपालीपर्यंत जायचा तर माणूस खाऊन पिऊन असला पाहिजे. मी पोलिसांना सांगून पटोद्याहून थेट मुंबईला जाईल.', असे सुतोवाच मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी सुरू आहे. ठाकरेंच्या वकिलांच्यानंतर शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. आज पुन्हा शिंदेचे वकील निरज कौल हे युक्तिवाद करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.