500 Crore Audio Clip Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : SIT तपासाला लागली, मनोज जरांगेंशी साधला संपर्क : 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपबद्दल महत्वाची सूचना

500 Crore Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या कथित व्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. समितीने ऑडिओ क्लिप मागितली असून जरांगेंनी ती देण्याची तयारी दर्शवली.

Jagdish Pansare

Maharashtra Politics News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत भाजपकडून आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याचा दावा करणारी कथित ऑडिओ क्लिप २२ ऑक्टोबर २०२६ रोजी जालना येथे पत्रकार परिषद घेऊन सार्वजनिक केली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होऊन महायुतीतील सत्ताधारी शिवसेना-भाजप यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली होती.

राज्य सरकारला या कथित ऑडिओ क्लीपचे हादरे बसू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची व ऑडिओ क्लीपची एसआयटीकडून चौकशी करण्याची घोषणा केली. तसेच ऑडिओमधील आवाजाची फाॅरेन्सीक लॅबमधून तपासणी करण्याचेही निर्देश दिले होते. एसआयटी स्थापन झाल्यानंतर या समितीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांना पत्र पाठवल्याची माहिती आहे.

पाचशे कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचा संवाद असलेली कथित ऑडिओ क्लीपची मागणी एसआयटीने जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे. जरांगे पाटील यांनी ती क्लीप देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.

२० ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील नारायण गड येथील दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर २२ ऑक्टोबरला त्यांनी एक ऑडिओ क्लिप माध्यमांना ऐकवली. त्यामध्ये भाजपशी संबंधित बैठकीतील संभाषण असल्याचा दावा करण्यात आला. या संभाषणात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगे यांच्यापर्यंत ५०० कोटी रुपये पोहोचल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले.

या ऑडिओ क्लीपमधील आवाजात, मला 500 कोटी रुपये दिले म्हणून भाजपाकडून कुणी पैसे घेतले, मला खरंच दिले का? असा सवाल करत जरांगे पाटील यांनी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना कोंडीत पकडले होते. त्यानंतर, संबंधित ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत करण्यात आली. आता संबंधित समितीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला आहे.

याप्रकरणी, चौकशी सामितीने जरांगे यांना पत्र देऊन ऑडीओ क्लिपची मागणी केली. त्यानंतर, जरांगे यांच्याकडून तपास यंत्रणेला ऑडिओ क्लिप देण्याची तयारी दर्शवली आहे. ऑडिओ क्लिपचा सोर्सही आपण सांगू, पण मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी ऑडिओ क्लिप देणाऱ्याच्या जीवाला धोका होणार नाही याची शाश्वती द्यावी, असे जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे.या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करून त्यामागील सूत्रधारांचा चेहरा समोर आणावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT