

Kolhapur News : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. संघावर चार शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्यास राज्य मंत्रिमंडळाने 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. विशेष म्हणजे, या सदस्यांना मतदानाचा अधिकारही देण्यात येणार असल्याने गोकुळमधील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीसमोर नवे आव्हान उभे राहिले असून, पाटील यांनी सरकारच्या निर्णयाला कायदेशीर आणि राजकीय पातळीवर विरोध करण्याचा इशारा दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर शासननियुक्त सदस्य नेमण्यास आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यास मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम गोकुळ दूध संघावर होणार आहे. गोकुळमध्ये महायुतीला सत्तास्थापनेसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, या निर्णयाची व्याप्ती राज्यातील अन्य मोठ्या सहकारी संस्थांनाही लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावर सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जनतेने आणि दूध उत्पादक सभासदांनी दिलेला कौल सरकारने मान्य केला पाहिजे. मात्र, सत्ताधाऱ्यांना अपेक्षित निकाल मिळाला नाही म्हणून नियम बदलून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न होत असेल, तर निवडणुकांना अर्थच उरणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
“सरकारला आपल्याला हवी तीच माणसं संस्थांवर नेमायची असतील, तर निवडणुका घेण्याची गरजच काय? मग सहकारी संस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकाही रद्द करा. शासनानेच माणसं नेमावीत आणि त्यांनीच सगळा कारभार चालवावा,” अशा शब्दांत पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला. गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष बसवण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करत, या निर्णयाविरोधात आपण शांत बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याबरोबरच रस्त्यावर उतरूनही लढा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
'सहकार क्षेत्रासाठी काळा दिवस'
मतदारांनी स्पष्ट कौल दिल्यानंतरही अशा प्रकारे शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे, हा सहकार क्षेत्रासाठी काळा दिवस असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली. केवळ सत्ता मिळवण्यासाठी सरकार कोणताही निर्णय घेऊ शकते, असा संदेश या निर्णयातून जात असल्याचे ते म्हणाले. एखाद्या संस्थेत अपेक्षित सत्ता मिळाली नाही, तर भविष्यात अन्य संस्थांमध्येही अशाच पद्धतीने हस्तक्षेप होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शासननियुक्त सदस्यांना प्रत्यक्षात मतदानाचा अधिकार मिळणार आहे का, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे सांगत, तसे झाल्यास तो निर्णय दुर्दैवी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
'कोरमसाठी दोन संचालकांचा पाठिंबा मागणे हास्यास्पद'
गोकुळमध्ये पूर्ण बहुमत असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीकडून कोरम पूर्ण करण्यासाठी दोन संचालकांचा पाठिंबा मागितला जात असल्याच्या मुद्द्यावरही पाटील यांनी टीका केली. महायुतीची ही भूमिका हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्तेच्या गणिताचा दाखला देत महायुतीला खोचक टोला लगावला. “महानगरपालिकेत आमचे पाच नगरसेवक कमी आहेत. त्यामुळे महायुतीने आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमचा महापौर करावा,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
2029 मध्ये सत्तेची समीकरणे बदलतील; पाटील यांचा इशारा
विरोधी पक्षात राहण्याचा कौल मतदारांनी दिला असेल, तर तो स्वीकारण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवली पाहिजे, असेही पाटील म्हणाले. आपण सरकारला पाठवलेल्या पत्राला उत्तर देण्यासाठी महायुतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर सही कोण करणार, यावरूनही त्यांच्यात मतभेद झाल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, सध्याची सत्तेची समीकरणे कायम राहणार नाहीत आणि 2029 मध्ये परिस्थिती बदलेल, असा इशाराही त्यांनी दिला. “आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू. एका मताची किंमत किती महत्त्वाची असते, हे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये,” असे ते म्हणाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा एका मताने पराभव झाल्याच्या घटनेचा दाखला देत त्यांनी महायुतीला सूचक इशारा दिला.
गोकुळ दूध संघातील शासननियुक्त सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय आणि त्यांना मिळणाऱ्या मतदानाच्या अधिकारामुळे आगामी काळात संघातील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आता या निर्णयाला सतेज पाटील कोणत्या कायदेशीर मार्गाने आव्हान देतात आणि सरकारची पुढील भूमिका काय राहते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.