Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil Mother: मराठा आरक्षणासाठी 'आर पार'ची लढाई पुकारत सरकारला हादरवणारे जरांगे पाटील आईला पाहताच ढसाढसा रडले

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दंड थोपटलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा शुक्रवारी अकरावा दिवस आहे.

Deepak Kulkarni

Jalna Protest News: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव पंधरा दिवसांपूर्वी कुणाच्या मनीध्यानी पण नव्हतं. मात्र, आता तेच गाव आता राज्यच नाही तर देशपातळीवर चर्चेत आले आहे. सर्वसामान्य माणूस इरीला पेटला तर काय करु शकतो हे अख्ख्या देशानं पाहिलं. मनोज जरांगे पाटील हे नाव माहिती नाही असा माणूस आता शोधून सापडणंही कठीण आहे. या माणसाने सरकारला तर झुकवलंच शिवाय एरवी गेंड्याच्या कातडीची समजल्या जाणाऱ्या राजकीय नेतेमंडळींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही ताळ्यावर आणलं.

मराठा आरक्षणासाठी 'आर या पार'लढा पुकारत गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषण पुकारलेले जरांगे पाटील आता मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनले आहे. घरावर तुळशी पत्र ठेवून जिवाची पर्वा न करता जरांगेंनी सरकारला मराठा आरक्षणासाठी आक्रमक पावले उचलण्यास भाग पाडले. आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या अशाच आक्रमक, कणखर बाण्याच्या जरांगे पाटलांना आईला पाहताच हा सरकारसह यंत्रणांना घाम फोडणारा हा पहाडी माणूस काही क्षणांपुरता का होईना गहिवरला.

मराठा समाजाच्या न्यायासाठी दंड थोपटलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा शुक्रवारी अकरावा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घोषणेनंतर मराठा आरक्षणाबाबतचा महत्त्वपूर्ण जीआर देखील राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे.यानंतर जरांगे हे उपोषण मागे घेतील असे वाटले होते. पण तरीदेखील वंशावळीची अट नको म्हणत सुधारित जीआर काढा, नंतर उपोषण मागे घेणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली.

गेल्या अकरा दिवसांपासून अन्नाचा एक कणही न घेतलेल्या मनोज जरांगे पाटलांना(Manoj Jarange Patil) काळजीपोटी भेटण्यासाठी त्यांची आई दाखल झाली. आईजवळ येताच त्यांनी आईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी आईला घट्ट मिठी मारली. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांना अश्रूही अनावर झाले. त्यांना शब्दही फुटेना.अखेर याही अवस्थेत आईच पुढे आली. आईने जरांगेचे अश्रू पुसत त्यांना सावरले. यावेळी आजूबाजूच्या लोकांनाही ही मायलेकाची भेट पाहून गहिवरून आले.

जरांगे पाटलांच्या आई काय म्हणाल्या...?

मराठा आरक्षणा(Maratha Reservation) साठी जीव देण्याची भूमिका घेत लढा उभारलेल्या लेकाला बघण्यासाठी अकराव्या दिवशी उपोषणस्थळी थेट मनोज जरांगे पाटलांची आई प्रभावती जरांगे पाटील दाखल झाल्या. यावेळी आई प्रभावती जरांगे पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाविषयी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या, माझ्या मुलाच्या पाठी सर्वांनी उभं राहावं. मराठ्यांना आरक्षण द्या, माझ्या बाळाला न्याय द्या. सर्व बाळांना न्याय द्या असेही जरांगे पाटलांच्या आईने म्हटलंय.

मराठा समाजाला जरांगेची 'ही' विनंती...

आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी मराठा तरुणांना कळकळीची विनंती केली आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुरू आहे. टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, शांततेत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. कायदा सुव्यवस्था बिघडेल, आंदोलनाला गालबोट लागेल, असे काही करू नका असेही ते म्हणाले.

'' आता एकाही मराठ्याला झुकू देणार नाही...''

आंदोलन करताना तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर तुमच्या शिक्षणात अडचणी निर्माण होतील असे जरांगे म्हणाले. माझ्यावर विश्वास ठेवा, कोणीही उग्र आंदोलन करू नका. मी गावासाठी कर्म भूमीसाठी जीव पणाला लावला. माझ्यासाठी मराठा समाज पेटून उठला आहे. या पोराच्यापाठी उभं राहिलं पाहिजे म्हणून लोक माझ्यामागे उभे राहिले आहे. महाराष्ट्रातील माता माऊलींना सांगतो, यापुढे आरक्षणासाठी मुडदे पडू देणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर मराठ्यांची मान खाली जाऊ देणार नाही. मी एकाही मराठ्याला झुकू देणार नाही अशा भावनाही जरांगे पाटलांनी व्यक्त केल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT