Jalna News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे एकोणिसाव्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची शिष्टाई अखेर यशस्वी ठरली. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक दिवसही देणार नाही ही आधी घेतलेली भूमिका तीन महिन्यांची मुदत देण्यात बदलली. त्यामुळे विरोधक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडले आहेत.
मराठा समन्वयक डाॅ. संजय लाखे पाटील यांनी तर मनोज जरांगे पाटील यांचे हे आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चारित्र्य हनन करण्यासाठीच होते, असा गंभीर आरोप केला आहे. जालना येथे पत्रकार परिषद घेत लाखे पाटील यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला. हे आंदोलन मराठा समाजासाठी आहे की राजकीय अजेंडा? असा सवाल करत लाखे यांनी जरांगे पाटील यांच्या बदलत्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.
उपोषण मागे घेताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना समजून आणि सांभाळून घ्या, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले. त्यामुळे हे आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नाही तर राजकीय सुपारी घेऊन विखे पाटील यांना प्रोजेक्ट करण्यासाठीच होते का? असा सवालही केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले, असा घणाघात करणाऱ्या जरांगेंची भूमिका अचानक कशी बदलली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी जरांगे यांचे हे आंदोलन होते. एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमून दस्तावेज शोधण्याचे काम केले.
मनोज जरांगे पाटील यांचा मुलगा शिवराज याच्यावर मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी जरांगे पाटील यांची तिथे जाऊन भेट घेतली. या भेटीतच एकनाथ शिंदे यांच्या चारित्र्य हननाचा कट शिजला असा आरोप लाखे पाटील यांनी केला. शिंदेंनी साडेतीन लाख प्रमाणपत्र कुणबींना दिली, एसईबीसी प्रमाणपत्र दिली, त्यांनाच तुम्ही शिव्या देणार का? सामाजिक आंदोलनाचा बुरखा घालून एकनाथ शिंदे यांचे चारित्र्य हनन करण्याची सुपारी घेतली गेली, असा आरोप त्यांनी केला.
हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी मराठा असा वेगळा उल्लेख असल्याचा दावाही लाखे पाटील यांनी केला. हैदराबाद संस्थानात पंजाबराव देशमुख यांनी केलेली चळवळ मराठ्यांना मान्य नव्हती, त्यामुळे पाटोद्यात वैधानिक मूर्खपणा करण्यात आल्याची टीका लाखे पाटील यांनी केली. बेकायदेशीर जमाव जमवून केल्या जाणाऱ्या या आंदोलनाला विखे पाटील यांचाही पाठिंबा आणि सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,
तसेच त्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही लाखे पाटील यांनी केली. एक वर्ष 20 दिवस झाले तरी हैदराबाद गॅझेटप्रमाणे एकही प्रमाणपत्र मिळाले नाही आणि मिळू शकत नाही, त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे मिळालेले सर्टिफिकेट मराठ्यांनी स्वीकारू नये, असे आवाहनही संजय लाखे पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.