Rahul Gandhi vs Stalin : काँग्रेसने आघाडी तोडली, जिव्हारी घाव बसलेल्या स्टॅलिन यांचा थेट राहुल गांधींना धक्का देण्याचा प्लॅन? आधी ठाकरे, पवार अन् आता बॅनर्जी...

MK Stalin DMK, Congress, Kanimozhi meetings, DMK third front : डीएमके, तृणमूल, आपसारख्या प्रमुख घटक पक्षांचा काँग्रेसवर अविश्वास वाढत असताना २०२९ च्या निवडणुकीआधी स्टॅलिन, ममता, ठाकरे-पवार यांची नव्या समीकरणांसाठीची चाचपणी राहुल गांधींच्या नेतृत्वाला थेट आव्हान.
MK Stalin, Rahul Gandhi
MK Stalin, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

DMK vs Congress update : मागील काही महिन्यांत इंडिया आघाडीमध्ये देशपातळीवर अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला जोरदार टक्कर देत लोकसभेत सरकारला दोन तृतियांश बहुमतापासून दूर ठेवल्यानंतर आघाडीचा आत्मविश्वास भलताच वाढला होता. मात्र, मागील काही महिन्यांतील घडामोडींनी हा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे चित्र आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून आक्रमकपणे सरकारविरोधात भूमिका घेतली जात असली तरी आघाडी एकसंध ठेवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेबाबत शंका वाटावी, अशी सध्याची राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. आता आघाडीतील घटकपक्षच काँग्रेससमोर आव्हान तर उभे करणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होतो.

आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीची खरी कसोटी लागणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागांपर्यंत मजल मारली खरी पण प्रमुख विरोधी पक्ष म्हणून अन्य विरोधी पक्षांना सोबत ठेवण्यासाठी अपेक्षित हालचाल होताना दिसत नाही. मागील काही महिन्यांतील राहुल गांधी यांची आक्रमक भूमिका काँग्रेससाठी सकारात्मक असली तरी केवळ एकट्याच्या बळावर सत्ता काबीज करता येणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

भाजपविरुध्द लढायचे असल्यास आघाडीतील प्रत्येक पक्ष महत्वाचा असून त्यांना ताकद देणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याच्या स्थिती काँग्रेस त्या भूमिकेत दिसत नाही. आघाडी खिळखिळी होताना दिसत आहे. आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तृणमूल काँग्रेसचेही दोन तुकडे झाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींना पायउतार व्हावे लागले आहे. तर तमिळनाडूत डीएमकेची सत्ता गेली आहे. बिहारमध्ये आरजेडी ताकद कमी झाली असून जम्मू काश्मीरमध्ये वंदे मातरमच्या मुद्द्यावर सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसच्या विपरीत भूमिका घेतली आहे.

MK Stalin, Rahul Gandhi
NIA court verdict : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारासह 29 जण गेले; देश हादरविणाऱ्या हत्याकांडाचा 13 वर्षांनंतर लागला निकाल...

तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर काही तासांतच काँग्रेसने डीएमकेसोबतची आघाडीत तोडत विजय यांना साथ दिली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन चांगलेच दुखावले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकांना त्यांचे नेते जात नाहीत. त्यांच्या डोक्यात वेगळंच काही तरी शिजत नाही ना, अशी शंका येईल अशा घडामोडी मागील काही दिवसांत घडल्या आहेत.

स्टॅलिन यांच्या भगिनी खासदार कनिमोझी यांच्या माध्यमातून ते तिसऱ्या आघाडीची चाचपणी करत असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी कनिमोझी यांनी मुंबई उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुरुवारी त्या ममता बॅनर्जी यांना भेटल्या. या भेटीगाठींमागेच नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा पुढे केला जात असला तरी ही तिसऱ्या आघाडीची चाचपणी असल्याचे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

MK Stalin, Rahul Gandhi
BJP MP case : लोकसभेत काँग्रेसच्या ज्या नेत्याने केला पराभव, भाजप उमेदवाराचे त्यांच्याच लेकीशी लग्न; आता पत्नी खासदार, पण झाला घटस्फोट

काँग्रेसने आघाडी तोडल्याचा घाव स्टॅलिन यांच्या जिव्हारी बसला आहे. आता आगामी निवडणुकीत तमिळनाडूत डीएमके आणि काँग्रेसची आघाडी होणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून विजय यांना इंडिया आघाडीत घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. असे झाल्यास डीएमके अधिकृतपणे आघाडीतून बाहेर पडेल.

स्टॅलिन यांचे ममता बॅनर्जी यांच्यासोबत चांगले राजकीय संबंध आहेत. आम आदमी पक्षानेही इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला आहे. काँग्रेस आणि आप या दोन पक्षांचा पंजाबमध्ये संघर्ष सुरू आहे. नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचीही स्टॅलिन यांना साथ मिळू शकते.

स्टॅलिन यांचा राजकीय प्लॅन नेमका काय आहे, हे जरी सध्या उघड झाले नसले तरी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. काँग्रेस काही राज्यांमध्ये स्वबळावर लोकसभेत जागा मिळवू शकत नाही. मित्रपक्षांची सोबत असल्याशिवाय काँग्रेसची ताकद क्षीण आहे.

देशातील प्रमुख राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, महाराष्ट्रात ठाकरे, पवार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी, बिहारमध्ये तेजस्वी यादव, काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला, झारखंडमध्ये हेमंत सोरेन आणि तमिळनाडूत पूर्वी स्टॅलिन अन् आता विजय हे महत्वाचे आहेत. त्यामुळे आघाडी अधिक मजबूत करून राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com