manoj jarange patil Sarkarnama
मराठवाडा

Manjo Jarange Bhashan : 'माझ्या नादी लागाल तर सोडणार नाही'; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

Sachin Fulpagare

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील जंगी सभेत पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील यांनी नाव न घेता भुजबळांवर जोरदार टीका केली आहे.

'आता तर नवीनच एक फॉर्म्युला आला आहे. त्याला (छगन भुजबळ ) बोलत नव्हतो मी. आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही. माझ्या एकट्याच्याच मागे लागलेत, असं ते एक दिवस म्हणाले. आरक्षणाला विरोध नाही म्हटल्यावर आपण बोलायचं बंद केलं, पण काल पुन्हा फडफड करायला लागले. सभेला ७ कोटी रुपये खर्च आला, पण आम्ही काय शेत विकत घेतलं आहे का? १०० एकर विकत घेतलेलं नाही. सभेसाठी भाड्याने जागा घेतली आहे. काही शेतकऱ्यांनी फुकट दिली आहे जागा. मराठ्यांनी आपल्या स्वखर्चाने गाड्या केल्या आहेत. आणि ते म्हणतात १० रुपये देत नाहीत. ते तुम्हाला देत नसतील', असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.

'तुम्हाला १० रुपयेही लोक देत नसतील. त्याचं कारणही सांगतो. ज्या गोरगरीब मराठ्याने तुम्हाला मोठं केलं, त्यांचच रक्त पिऊन तू पैसा कमवला म्हणून तुझ्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली. गरिबांचे पैसे खाल्ले आणि दोन वर्षे तुरुंगात राहून बेसन खाऊन आले. आणि आम्हाला शिकवता पैसे कुठून आले?', असं म्हणत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर बोचरी टीका केली आहे.

'माझा मायबाप मराठा शेतात काबाडकष्ट करतो. आम्ही घाम गाळतो. त्या घामातून आम्ही आमचा निधी जमा केला आहे. गोदापट्ट्यातल्या १२३ गावांनी मिळून. कापूस विकून अन् घाम गाळून मिळवलेले पैसे १००० ते ५०० रुपये जमा केले. आणि या महाराष्ट्रातून येणाऱ्या समाजबांधवांच्या सेवेचं काम या १२३ गावांनी केलं. तुमच्या सारखं नाही आमचं', असं जरांगे पाटील यांनी सुनावलं.

'महाराष्ट्रातला मराठा समाज आम्हाला निधी द्यायला तयार होता, पण आम्हाला १२३ गावांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची सेवा करायची आहे. यामुळे एक रुपयाही नको, असं आम्ही सांगितलं. ७ कोटींचा खर्च काढणाऱ्याला का हिशेब देऊ. सात आठ वेळा तुरुंगात गेले. पुन्हा जायची वेळ आली आहे. मराठा समाजासाठी हा हिशेब सांगतो. १२३ गावांतील २२ गावांतल्या लोकांनी पैसे दिले. तेच २१ लाख झाले. आणखी १०१ गावांकडे पैसा जमा आहे. तरीही घेतला नाही. कारण हे आंदोलन पैशासाठी नाही. हे न्यायासाठी आहे', असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

'त्यांना (छगन भुजबळ) शेती घ्यायचं वेड लागलं आहे. जनतेचे पैसे खाताहेत. त्याच्यामुळे १०० एकरमध्ये सभा घेतल्यावर त्यांना असं वाटलं, आपण शेतीच विकत घेतली. सात कोटी खर्च आला. हे आम्ही पहिल्यांदा ऐकलं. काय बोलावं आणि काय नाही, एवढ्या मोठ्या नेत्याला कळालं पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना (छगन भुजबळ ) समज द्यावी. माझ्या नादी लागल्यावर मी सोडतच नाही', असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT