Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Nanded Politics : मराठा समाज आक्रमक; थेट अशोक चव्हाणांचे भाषणच थांबवले, नांदेडमध्ये नेमके काय झाले?

Nanded Lok Sabha Constituency : प्रताप पाटील चिखलीकरांना समोर बोलावून घेत सकल मराठा समाज बांधवांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलक निघून गेले आणि चव्हाणांनी पुन्हा भाषण सुरू केले.

Jagdish Pansare

Nanded Political News : महायुतीचे नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत सकल मराठा समाज संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. समाजाच्या तरुणांनी सभास्थळी अचानक येत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकरांना मराठा आरक्षणाचा जाब विचारला. आमचे लेखी निवेदन आधी घ्या, मग भाषण करा असे म्हणत निवेदन स्वीकारण्यासही भाग पाडले.

अशोक चव्हाणांनी सभा संपल्यानंतर तुमचे निवदेन स्वीकारतो, चर्चा करतो अशी भूमिका घेतली होती. परंतु मराठा बांधव आक्रमक होते, त्यांनी आधी निवेदन स्वीकारा म्हणत सभा बंद पाडली. आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेता चव्हाणांनी आपले भाषण थांबवले. उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांना समोर बोलावून घेत सकल मराठा समाज बांधवांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलक निघून गेले आणि चव्हाणांनी पुन्हा भाषण सुरू केले.

अचानक घडलेल्या या प्रकाराने मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मागणीवरून असलेला संताप पुन्हा एकदा दिसून आला. याआधी अशोक चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी चव्हाण यांना गावात येण्यापासून रोखण्यात आल्यामुळे त्यांच्यावर परत फिरण्याची वेळ आली होती.

जांब (ता. मुखेड) येथे गुरुवारी (ता. १८) महायुतीची प्रचारसभा सुरू पार पडली. त्यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव सभेत आले. त्यांचे निवेदन अशोक चव्हाणयांनी स्वीकारावे, अशी त्यांची मागणी होती. सभा संपल्यावर आपण चर्चा करू, अशी विनंती चव्हाण यांनी त्यांना केली. मात्र, आताच निवेदन स्वीकारावे असा त्यांचा आग्रह असल्याने भाषण थांबवून चव्हाण, चिखलीकर या दोघांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलक निघून गेले व सभा पुन्हा सुरू झाली.

अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी येथे जाऊन मध्यरात्री भेटले होते. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली होती. याचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी प्रचार सभांच्या दरम्यान अनेकदा केला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आपली भूमिका असल्याचे सांगतानाच आपल्याला कुठेही मराठा समाजाचा विरोध नसल्याचे चव्हाण यांनी सांगतिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या दाव्यानंतर त्यांना नांदेड जिल्ह्यातच दोन ठिकाणी मराठा आंदोलकांनी गावात येण्यापासून रोखले होते. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचार अंतिम टप्यात आलेला असतांना महायुतीच्या सभेत धडक देत सकल मराठा समाजाने अशोक चव्हाण यांना आरक्षणाच्या प्रश्नावरून जाब विचारला. अचानक घडलेल्या या प्रकाराने महायुतीच्या सभेत काहीकाळ गोंधळाचे वातावरण होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT