Nashik Political News : शांतीगिरी महाराज यांच्याकडून सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू आहे. त्यासाठी त्यांची एक स्वतंत्र टीम कार्यरत आहे. त्यामध्ये विविध युवक काम करीत आहेत. निवडणुकीसाठी काही राजकीय मंडळींची सल्लागार समितीदेखील त्यांनी तयार केली आहे. या समितीच्या सूचनेनुसार ते प्रचारात मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्या भक्तांना ते रोज एक संदेश देत असतात. भक्तांनी स्वखर्चाने त्यांचा प्रचार करावा. स्वतःचे वाहन घेऊन मतदारांच्या गाठीभेटी कराव्यात. इथपासून तर विविध प्रकारचे उपक्रम ते राबवित आहेत. त्यांचे हे उपक्रम चर्चेचा विषय ठरले आहेत.
शांतीगिरी महाराज यांनी नुकतेच सर्व राजकीय पक्षांना एक आवाहन केले आहे. आतापर्यंत नाशिक मतदारसंघातून विविध 17 खासदार जनतेने निवडून दिले आहेत. त्यामुळे यंदा राजकीय पक्ष आणि मतदारांनी शांतीगिरी महाराज यांचा विचार करावा. सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करावा. ही निवडणूक बिनविरोध कशी होईल, यासाठी पुढाकार घ्यावा. शांतीगिरी महाराज यांना बिनविरोध निवडून द्यावे. तसे करून राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आपली शान राखावी, असे आवाहनच त्यांनी केले आहे.
नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात यंदा विविध धार्मिक नेत्यांनी रस घेतला आहे. यापूर्वी स्वामी कंठानंद यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. त्यांनी थेट भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशदेखील केला. मात्र भाजपमध्ये आधीच अनेक इच्छुक होते. हा मतदारसंघदेखील भाजपला मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता त्र्यंबकेश्वर येथील सिद्धेश्वरानंद यांनीदेखील स्थानिक आखाड्यांच्या पाठिंब्याने उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. तेदेखील आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. या धार्मिक मंडळींनी राजकीय पक्षांकडे उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. शांतीगिरी यांनीदेखील भारतीय जनता पक्ष, शिवसेना ठाकरे गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि मनसे या पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. आता त्यांनी थेट या राजकीय पक्षांना आवाहन करून बिनविरोध निवडणुकीसाठी स्वतःचे नाव रेटले आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न राजकीय नेते कितपत गांभीर्याने घेतात याची चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय पक्षांमध्ये नाशिकच्या मतदारसंघावरून मोठा वाद सुरू आहे. धार्मिक नेत्यांच्या उमेदवारीच्या चर्चेचा विषय मतदारांमध्ये आहे. महायुतीच्या घटक पक्षांतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट यांच्यात मतदारसंघावरून तीव्र स्पर्धा आहे. त्याहीपेक्षा अधिक स्पर्धा शिंदे गटातील इच्छुक उमेदवारांमध्ये आहे. या स्थितीत शांतीगिरी यांनी त्यांच्या भक्तांना दिलेला संदेश या निवडणुकीत वेगळी चर्चा घडविण्यात यशस्वी होईल का याची चर्चा आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.