Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील (कुणबी) मराठा जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले जात असल्याने या समाजामध्ये रोष आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विरोधात अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे जात पडताळणी समितीकडून वैधता दिलेल्या प्रमाणपत्रांची नव्याने चौकशी केली जात असल्याचा प्रकार महादेव कोळी, मल्हार कोळी, मन्नेरवारलू जमातीच्या बाबतीत घडत असल्याचे समोर आले आहे.
आजही मराठवाड्यातील अनुसूचित जमातीच्या जात पडताळणी समितीकडून महादेव कोळी, मल्हार कोळी, मनेरवारलू या जमातीच्या लोकांना मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. एकदा जात पडताळणी समितीकडून गृह चौकशी करून वैधता दिल्यानंतर पुन्हा वंशावळीतील व्यक्तीला कोणत्याही गृह चौकशी शिवाय गुणवत्तेनुसार प्रमाणपत्राची वैधता देण्याचा नियम आहे.
परंतु छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमातीच्या जात पडताळणी समितीकडून देण्यात आलेल्या वैधता प्रमाणपत्राची पुन्हा फेर चौकशी करून नाहकपणे प्रमाणपत्र धारकाची छळवणूक केली जात आहे. सर्रासपणे नोटीसा पाठवून आपली दिलेली वैधता रद्द करण्यात का येऊ नये? म्हणून पुन्हा प्रकरण ओपन केले जात असल्याचा अजब प्रकार सुरू आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजातील कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत, मिळालेल्या प्रमाणपत्रांना जात पडताळणी समितीकडून वैधता दिली जात नाही म्हणून थेट उपोषणाचे हत्यार उभारले आहे. तर दुसरीकडे याच मराठवाड्यातील अनुसूचित जमातीच्या जात पडताळणी समितीकडून महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमातीचे वैधता धारकांना आपले दिलेले जात वैधता प्रमाणपत्र अवैध का? करण्यात येऊ नये? म्हणून नोटीसा बजावल्या जात आहेत.
पुन्हा त्यांची प्रकरण ओपन केले जात असून येथील जात पडताळणी समिती वैधता देण्यासाठी आहे की, अवैध ठरवण्यासाठी? असा संतप्त सवाल केला जात आहे. शिवाय ज्याना पंधरा ते वीस वर्षापूर्वी वैधता देण्यात आल्या आहेत, अशा वैधता धारकांनाही नोटीसा पाठवून प्रकरणे अवैध ठरवली जात आहेत. यामुळे मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी जमातीत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
जात पडताळणी समितीचा भोंगळ कारभार यानिमित्ताने चर्चेत आला आहे. मराठवाड्यात यापूर्वी महादेव कोळी जमातीकडून जातीचे प्रमाणपत्र व वैधता सुलभतेने मिळावे म्हणून अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र, राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे हा विषय प्रलंबित राहत आहे. मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमात बांधवांना जात पडताळणी समितीचा अन्याय सहन करावा लागत आहे.
मराठवाड्यातील बालाघाट डोंगर रांगा व अजिंठा डोंगर रांगामध्ये महादेव कोळी आणि मल्हार कोळी जमातीचे प्राचीन काळापासून वास्तव्य आहे. याबाबतचे ब्रिटिश कालीन आणि निजाम कालीन अनेक संदर्भ ग्रंथ, संशोधनपर ग्रंथ, जनगणना आणि ब्रिटिश कालीन गॅझेटचे अहवाल आहेत. नगर, नाशिकमधील महादेव कोळ्यांचे परंपरागत मूळ वस्ती स्थान मराठवाड्यातील बालाघाट डोंगर रांगा असल्याबाबतचे अनेक पुरावे आहेत.
मराठवाड्यात कोळ्यांच्या केवळ दोनच उपजाती आढळतात त्या म्हणजे महादेव कोळी आणि मल्हार कोळी. याबाबतीतही तत्कालिन संदर्भ ग्रंथात विस्तृतपणे लिखाण करण्यात आलेले आहे. तरीही जात पडताळणी समितीकडून आजपर्यंत संशोधन करण्यात येत नसल्याचा आरोप या जमातीकडून केला जात आहे. त्या जमातीच्या अनेक वर्षापासून असलेल्या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत.
काय आहेत मागण्या?
१) निजाम कालीन व ब्रिटिश कालीन ऐतिहासिक संदर्भ व जुन्या नोंदी व पुराव्याच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र देण्या संदर्भात मा. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही जात पडताळणी समितीकडून पुन्हा चौकशीच्या नावाखाली होणारी हेळसांड थांबवावी.
२) कुटूंबातील व्यक्तीला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर पुन्हा चौकशीच्या नावाखाली रक्त नात्याच्या संबधातील (मुलगा, मुलगी, आत्या, चुलता याची अनावश्यक चौकशा केली जाते. कुटूंबात वैधता असतानाही प्रत्येक प्रकरणाची गृह चौकशी केली जाते हे केवळ मराठवाड्यातील जात पडताळणी समिकडून सुरू आहे. हा अन्याय त्वरीत थांबवून त्यांना वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.)
३) मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी या जमातीचे जात पडताळणी समितीतील संशोधन अधिकाऱ्यांनी त्वरीत संशोधन करून शासनाकडे अहवाल पाठवावा.
४) उपविभागीय अधिकाऱ्यांकडून फेटाळलेले जात प्रमाणपत्र देण्यासाठी त्वरित करवाई करावी.
५) अनुसूचित जात, जमाती, इतर मागास प्रवर्ग सादर केलेले सुधारणा विधेयक २०२६ तात्काळ रद्द करावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.