Maharashtra News Live Update : एकनाथ शिंदेंनी बंडखोर खासदारांना तुडवा म्हणणाऱ्या संजय राऊतांना दिलं आव्हान

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 19 June महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
 Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

एकनाथ शिंदेंनी बंडखोर खासदारांना तुडवा म्हणणाऱ्या संजय राऊतांना दिलं आव्हान

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा राबवले जाईल, असा इशारा दिला होता.तसेच त्यांनी बंडखोर खासदार मतदारसंघात दिसताच, त्यांना तुडवा, असे आदेशही शिवसैनिकांना दिले होते. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोखठोक भाष्य केलं. ते म्हणाले. हिम्मत असेल तर पुढे या. तुडवायला आलेल्यांचे पाय आमचे शिवसैनिक ठेवतील का? असं खुलं आव्हान शिंदे यांनी दिले आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा चिंधीचोर कोणी असेल, तर तो संजय राऊत: ज्योती वाघमारे 

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांवर टीकेची तोफ डागली. त्या म्हणाल्या, "संजय राऊतसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतो, 'खासदारांच्या अंगावर चिंध्या शिल्लक ठेवू नका.' अरे बाबा, आधी तुमच्या पक्षाच्या ज्या चिंध्या होऊन इकडे तिकडे पडल्या आहेत, त्या गोळा करा आणि मग बोला. या महाराष्ट्रातील सर्वात मोठा चिंधीचोर कोणी असेल तर तो संजय राऊत आहे,असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

मी जर बंडखोर खासदारांना भेटत नव्हतो, तर मग तुम्ही निवडून कसा आलात? उद्धव ठाकरे 

मी जर बंडखोर खासदारांना भेटत नव्हतो. मग तुम्ही निवडून कसा आलात? लोकसभेच्या निवडणुकीवेळी मी याच खासदारांसाठी पाच-पाच, सहा-सहा सभा घेतल्या आहेत. त्याचमुळे मी त्यांना आमदार,केलं,खासदार केलं,मंत्री केलं,मी जर हे मी म्हटलो,तर ते गर्वाचं ठरेल,अशी टीकेची तोफ उद्धव ठाकरेंनी बंडखोर खासदारांवर डागली.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शनिवारपासून पाणीकपात लागू होणार

पिंपरी-चिंचवड शहरावर अखेर पाणीकपातीचं संकट ओढावलं आहे. यंदा मान्सून लांबणीवर पडल्यानं 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. शनिवार(ता.20) पासून ही पाणीकपात लागू होणार आहे. शहराची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने आटल्याने पाटबंधारे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला थेट धरणातून मिळणाऱ्या पाणी साठ्यात 15 टक्के कपात करण्याचे आदेश दिले आहेत.

खासदारांच्या फुटीनंतरचा पहिलाच मेळावा; थोड्याच वेळात उद्धव ठाकरे अन् शिंदेंची तोफ धडाडणार 

शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिनानिमित्तचे मेळावे पार पडत आहे. ठाकरेंचे 9 पैकी सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा आहे. त्यामुळे षण्मुखानंद हॉलला उद्धव ठाकरे आणि गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Best Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल सुरूच

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून संप मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्याप यश आलेले नाही.

Nitesh Rane news : आदित्य ठाकरे हे ठाकरेसेनेचे अभिषेक बॅनर्जी

आदित्य ठाकरे हे ठाकरेसेनेचे अभिषेक बॅनर्जी असल्याची टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी बंड केले आहे. यापार्श्वभूमीवर राणेंनी आमदार आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

पवना धरणातील साठा घटला; पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून 15 टक्के पाणी कपात

पवना धरणातील पाणीसाठा केवळ 20 टक्क्यांवर आल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात आजपासून 15 टक्के कपात लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून उपलब्ध साठा अधिक काळ टिकवण्यावर भर दिला जाणार आहे.

ठाकरेसेनेचा 60 वा वर्धापनदिन आज; उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष

ठाकरेसेनेचा 60 वा वर्धापनदिन आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरभर मोठ्या प्रमाणात फलक आणि बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान, काही खासदारांच्या संभाव्य नाराजीच्या चर्चांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  आपल्या भाषणातून कोणता संदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का? 14 आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा

शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा एकदा राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. काही खासदारांनंतर आता अनेक आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील १४ आमदार शिंदे सेनेत प्रवेश करू शकतात, असा दावा केला आहे. तर मंत्री शंभूराज देसाई यांनीही अशाच हालचालींचे संकेत दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

मातोश्रीवर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा

काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दिल्लीतील अलीकडील राजकीय घडामोडींचा आढावा यावेळी देण्यात आला. तसेच पक्षाशी संबंधित 6 खासदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे-नवी मुंबईकरांना दिलासा! कोपरी-पटनीदरम्यान उभारला जाणार नवा ६ पदरी पूल

ठाणे आणि नवी मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे खाडीवर कोपरी ते पटनी या मार्गादरम्यान आधुनिक 6 पदरी पूल बांधण्याची योजना राबवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार असून, प्रकल्पाच्या कामासाठी संबंधित यंत्रणेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Prasad Lad  : आमदार प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला

भाजप नेते व आमदार प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणच करु नये अशी विनंती यावेळी प्रसाद लाड यांनी केली. मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्याने मी त्यांचा आभारी असल्याचं लाड म्हणाले.

राजकीय संघर्षात उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची आठवण

राजकीय संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.... सोशल मीडियावर बाळासाहेबांचा एक बोलका फोटो शेअर करत त्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या ओळी लिहिल्या आहेत. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी. अस उद्धव ठाकरेंनी लिहलं आहे.

नाशिकमध्ये अवैध मद्यसाठा जप्त

नाशिकच्या येवला तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. रात्री नगरसुलमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल 70 हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्य साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. येवला तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मुंबईत बेस्टचा संप, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील बससेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. वडाळा डेपोत आंदोलन आणि कर्मचाऱ्यांची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसफेऱ्या रद्द झाल्याने अनेक बसस्टॉपवर प्रवाशांची गर्दी वाढली असून मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.

राजाभाऊ वाजे यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत

उद्धव ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. इतर खासदार पक्ष सोडून गेले तरी वाजे मात्र ठाकरेंसोबत कायम असल्याने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

भाजप आमदार-खासदारांची सोमवारी बैठक

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप आमदार-खासदारांची बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आमदारांचे रिपोर्ट कार्ड मांडणार आहे.

Prasad Lad : आमदार प्रसाद लाड आज जरांगेंना भेटणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीत जाऊन लाड जरांगेंना भेटणार आहेत.

Operation Tiger Vs Shivsena UBT : कृष्णा आष्टीकर यांचे सुषमा अंधारे यांना जोरदार प्रत्युत्तर

नागेश पाटील आष्टीकर यांनीही निष्ठा बदलल्याने शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. या टीकेला नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारे यांच्या आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. सुषमा अंधारे यांनी तर पार आमच्या खानदानीचा उद्धार केला, हे ऐकून मला खूप वाईट वाटले. वडील एका पक्षात आणि पुत्र दुसऱ्या पक्षात, हे समीकरण काही नवीन नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गजानन कीर्तिकर आहे, तर अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. अजून माझे वडील तिकडे गेलेत का? यांना कसली घाई आहे हेच मला कळत नाही. सुषमा अंधारे पुण्यात बसून गणित मांडत आहेत. अशा नेत्यांमुळेच त्यांना वीट आला असावा. आमच्यावर व्यक्त होण्याचं काही कारण नव्हते, असे कृष्णा पाटील आष्टीकरांनी सांगितले.

PM Modi : पंतप्रधान मोदींचा फ्रान्स दौरा यशस्वी! पॅरिसमधून मायदेशी रवाना होताना केले मोठे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा फ्रान्स आणि स्लोव्हाकियाचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक दौरा यशस्वीरित्या आटोपला असून, ते फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून मायदेशी रवाना झाले आहेत. हा दौरा भागीदारी आणि फलनिष्पत्ती या दोन्ही दृष्टीने ऐतिहासिक ठरल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात त्यांनी पॅरिसमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. "गेल्या 12 वर्षांत भारताचा जीडीपी दुप्पट झाला असून, एक विश्वासार्ह भागीदार म्हणून जागतिक पटलावर भारताचा उदय होत आहे. जागतिक व्यवस्था तेव्हाच प्रभावी ठरेल, जेव्हा ती सर्वसमावेशक असेल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Eknath Shinde Shivsena : शिवसेना ठाकरे पक्ष लक्ष्य, राज यांची मनसे नाही; शिंदे शिवसेनेचे अमेय घोले यांची प्रतिक्रिया

खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदे शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’चे जाळे मुंबई महापालिकेतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांवर फेकण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी तर ‘शिवसेना उद्धव पक्षाचे किमान 25 नगरसेवक आमच्या संपर्कात असून, नजीकच्या काळात ही संख्या 50 पर्यंत पोहोचेल,’ असा दावा केला. त्याचबरोबर मनसेचे आणि आमचे मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे त्यांचे नगरसेवक आमच्या पक्षात आणण्याचा प्रयत्न नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

Mumbai News : शिवसेना ठाकरे पक्षातील खासदार फुटीमुळे मुंबईत शहरात पोलिसांचा कडेकोट बंदबोस्त

शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आणि शिवसेना उद्धव पक्षाचे काही खासदार एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या हेतूने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासह आवश्यक त्या उपाययोजना करत, विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश विशेष शाखेने सर्व पोलिस उपायुक्ताना दिले आहे. विशेष शाखेकडून यासंदर्भात पत्र जारी करण्यात आलं आहे.

Delhi News : रेल्वे कर्मचाऱ्याकडे दोन कोटींची मालमत्ता

रेल्वेतील एका कर्मचाऱ्याने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेली दोन कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीस असलेल्या प्रशांत बलदेवभाई रबारी याच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जानेवारी 2017 ते फेब्रुवारी 2021 या काळात रबारीने स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे 2.58 कोटी रुपयांची मालमत्ता जमा केल्याचा ठपका ‘ईडी’ने ठेवला आहे. रेल्वेमध्ये लोको पायलट आणि गार्ड यांचे साहित्य चढवण्याचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचाराने खळबळ माजली आहे.

Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुधारणांसाठी मुख्य सचिवांची समिती

राज्यातील कर्जबाजारी शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ अधिक पारदर्शक, प्रभावी आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६च्या अमंलबजावणीचा नियमित आढावा घेऊन, आवश्यक त्या सुधारणा सुचविणार आहे.

Trinamool Congress : शेभनदेव चट्टोपाध्याय यांची याचिका; कलकत्ता उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाचे नेते ऋतुब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेता म्हणून पश्‍चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रथींद्र बोस यांनी दिलेल्या मान्यतेला अंतरिम स्थगिती देण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विधान सभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘तृणमूल’चे नेते शेभनदेव चट्टोपाध्याय यांचे नाव दिले होते. मात्र विधासभाध्यक्षांनी ते फेटाळून ऋतुब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली होती. त्याविरोधात चट्टोपाध्याय यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Meghalaya Voting List SIR : मेघालयात उद्यापासून ‘एसआयआर’ सुरू

मेघालयमध्ये उद्या, शनिवारपासून (ता. 20) मतदारयादीची विशेष सखोल फेरपडताळणी (SIR) मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बी. डी. आर. तिवारी यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत सात ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. 20 ते 29 जून या कालावधीत पूर्वतयारी करण्यात येईल, तर 30 जून ते 29 जुलै दरम्यान प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी केली जाईल. पाच ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com