Maratha Kunbi Certificate; Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Kunbi Certificate : बीडमध्ये प्रचंड वेगाने 'कुणबीकरण' : संपूर्ण मराठवाड्यात 3 लाख 15 हजार प्रमाणपत्रांचं वाटप

Kunbi certificate distribution in Marathwada : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केल्याने राज्यात वाद सुरू झाला आहे. तर या निर्णयाविरोधात आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे.

Jagdish Pansare

3.15 lakh Kunbi certificates Marathwada: मराठा-कुणबी प्रमाणपत्र आणि वाटप झालेल्या प्रमाणपत्रांची जात वैधता हा विषय सध्या राज्यभरात गाजतो आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

अंतरवाली सराटी येथे त्यांच्या अकराव्या बेमुदत उपोषण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. एकीकडे जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यात आतापर्यंत ३ लाख १५ हजार कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात सर्वाधिक प्रमाणपत्रांचे वाटप हे बीड जिल्ह्यात झाले आहे.

विभागीय प्रशासनाकडून सातत्याने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात आढावा घेतला जात आहे. गेल्या वर्षभरात म्हणजेच १ सप्टेंबर २०२५ ते १ सप्टेंबर २०२६ या एका वर्षात हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यात ७६ हजार २१३ कुणबी प्रमाणपत्रे वाटप केल्याची माहिती विभागीय आयुक्तालय प्रशासनातर्फे देण्यात आली.

३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आठ जिल्ह्यांत तब्बल ३ लाख १५ हजार ८४२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३ लाख १५ हजार २३४ कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. मराठवाड्यात दाखल अर्जांपैकी ५४३ अर्ज नाकारण्यात आले असून, ६५ अर्ज प्रलंबित आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४६ हजार ७२८ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून, त्यानंतर परभणी जिल्ह्यात ७ हजार २३६, छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ हजार १६५ आणि धाराशिवमध्ये ५ हजार ७०० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

आरक्षण उपसमितीकडून मराठवाड्यातील जिल्हानिहाय कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी आलेले प्रलंबित अर्ज किती, यासंदर्भात विभागीय आयुक्तालय प्रशासनाकडून वारंवार अपडेट घेतले जात आहे. दरम्यान, हा आकडा २५ ऑगस्ट रोजी ७२ हजारांवर होता. तो सहाच दिवसांत चार हजारांनी वाढून ७६ हजारांवर पोहोचला आहे. असे असले तरी हे प्रमाण अगदीच अल्प आहे.

बीडमध्ये अर्जांचा सर्वाधिक आकडा

समितीच्या स्थापनेपासून प्राप्त अर्जांच्या आकडेवारीत बीड जिल्हा आघाडीवर आहे. बीडमध्ये २ लाख ९ हजार ८७२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २ लाख ९ हजार ८५१ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ हजार ९१८, परभणीत २० हजार १०, धाराशिवमध्ये १९ हजार ९४५, जालन्यात १८ हजार ६६२, हिंगोलीत १३ हजार ६७२ आणि नांदेडमध्ये ४ हजार ९०७ अर्ज प्राप्त झाले. लातूरमध्ये २ हजार ८५६ अर्जांची नोंद आहे.

जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा प्राप्त अर्ज - दिलेली प्रमाणपत्रे - नाकारलेले अर्ज - शिल्लक अर्ज

संभाजीनगर - २५,९१८ - २५,८१९ - ९२ - ७

जालना - १८,६६२ - १८,५८६ - ६२ - १४

परभणी - २०,०१० - १९,९६१ - २९ - २०

हिंगोली - १३,६७२ - १३,६६६ - ६ - ०

नांदेड - ४,९०७ - ४,८८१ - १६ - १०

बीड - २,०९,८७२ - २,०९,८५१ - १० - ११

लातूर - २,८५६ - २,८०९ - ४५ - २

धाराशिव - १९,९४५ - १९,६६१ - २८३ - १

एकूण - ३,१५,८४२ - ३,१५,२३४ - ५४३ - ६५

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT