महावीर जालन
Dharashiv Latest News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सत्ताधाऱ्यांना आरक्षण समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
गावागावांत राजकीय नेत्यांना नो एन्ट्री करण्यात आली आहे, तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे त्यांना राज्यभरातून पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
पण यासंदर्भातील एक दुःखद घटना समोर आली असून, निपाणी (ता. भूम, जि. धाराशिव) येथील एका ३६ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. 'एकच मिशन मराठा आरक्षण' अशा आशयाची चिठ्ठी लिहून निपाणी येथील तरुण शेतकरी प्रवीण काकासाहेब घोडके याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली.
आरक्षणासाठी तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, जीवन यात्रा संपवू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध नेत्यांनी केले आहे. मात्र, आरक्षणासाठी मराठा समाजाच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. यामुळेच आलेल्या निराशामुळे प्रवीण घोडके यांनी जीवन संपवले. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण काकासाहेब घोडके यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, या नैराश्यातून बुधवारी दुपारी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
शवविच्छेदनासाठी मृतदेह ईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. तेथे पोलिसांना प्रवीण यांच्या खिशात चिठ्ठी आढळली. 'एकच मिशन मराठा आरक्षण' असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. प्रवीण यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आजी असा परिवार आहे. प्रवीणच्या आत्महत्येमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.