Eknath Shinde Sabha
Eknath Shinde Sabha Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी, शिंदे म्हणाले त्याला स्टेजवर आणा

जगदीश पानसरे :सरकारनामा

Eknath Shinde Sabha Akhada Balapur Hingoli :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आखाडाबाळापूर येथील शिवसंकल्प मेळाव्यातील भाषणावेळी एका तरुणाने मराठा आरक्षण द्या, शेतात पिकांचं नुकसान करणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करत घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी भाषणाला सुरूवात करताच समोर बसलेला एक तरुण उभा राहिला आणि त्याने घोषणा देण्यास सुरूवात केली.

या प्रकाराने पोलिसांची धावपळ उडलाी, बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी या तरुणाला ताब्यात घेत सभेतून बाहेर नेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टेजवर घेऊन, या त्याचे म्हणणे ऐकून घेऊ, तो आपलाच आहे, असे सांगत गोंधळ करू नका, खाली बसा असे आवाहन उपस्थीतांना केले. पोलिसांनी घोषणबाजी करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरूवात केली.

इकडे मुंबईत आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार होते. राज्यासह संपुर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागलेले असतांना मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्या नियोजित दौऱ्यानूसार शिवसंकल्प मेळाव्याला हजेरी लावली. शिंदेंनी अवघ्या पंधरा मिनिटांचे छोटेखानी भाषण केले आणि मेळावा संपवला.

या पंधरा मिनिटांच्या सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा एका तरुणाने प्रयत्न केला. भाषण सुरू होत असतांनाच या तरुणाने घोषणाबाजी करत मराठा आरक्षण जाहीर करा, शेतामध्ये नुकसान करणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली. तिकडे व्यासपीठावरून आमदार संतोष बांगर यांनी या तरुणाला खाली बसण्याचे आवाहन करत पोलिसांना त्याला शांत करण्यास सांगितले.

घोषणाबाजीमुळे सभास्थळी काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. परंतु मुख्यमंत्र्यांनी भाषण थांबवत तरुणाला बाहेर घेऊन जाणाऱ्या पोलिसांना त्याला स्टेजवर घेऊन या, त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेऊ. तो आपलाच आहे, असे म्हणत हा प्रकार पाहून उभ्या राहिलेल्या लोकांना खाली बसण्याचे आवाहन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांनी या सभेत शिवसेनेतील उठाव, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातील घरून कारभार करण्याचा मुद्दा उपस्थितीत करत त्यांच्यावर टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुर्ण करत असल्याचे सांगितले. राम मंदिर, कलम 370 हटवतो, मला एक दिवस पंतप्रधान करा, असे बाळासाहेब म्हणायचे. आज त्यांचे तेच स्वप्न मोदीजी पुर्ण करत आहेत. त्यामुळे भाजपने 2024 मध्ये मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अब की बार चार सौ पार चा नारा दिला आहे.

तसंच आपणही महाराष्ट्रात मिशन -48 चा शिवसंकल्प घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महायुती म्हणून आपलाही नारा महाराष्ट्रात अब की बार 45 पार असा, असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मुंबईत आमदार अपात्रतेच्या निकालाचे वाचन होणार असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण फारसे रंगले नाही. शिवाय पंधरा मिनिटात भाषण उरकत शिंदे यांनी प्रयाण केले. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने आलेल्या शिवसैनिक व लोकांचा हिरमोड झाला.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT