Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat : मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा लढा लढावा, पक्षीय राजकारणात पडू नये; खोतकर यांच्यानंतर मंत्री संजय शिरसाटही आक्रमक!

Sanjay Shirsat urged Manoj Jarange Patil to focus on the Maratha reservation: मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यावर लक्ष केंद्रित करावे, पक्षीय व वैयक्तिक राजकारणात पडू नये, असे आवाहन केले.

Jagdish Pansare

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील घरी कायम जाणारे शिवसेनेचे नेते आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जरांगे पाटील हे सातत्याने टीका करताना दिसले आहेत.

शिंदेंची शान मराठ्यांमुळे, या पठ्ठ्यामुळे वाढली असा दावा जरांगे पाटील यांनी मिशांवर ताव देत केला होता. त्यानंतर शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री जरांगे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. जालन्यात काल आमदार अर्जून खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे थांबवावे नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा दिला.

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकरांशी संवाद साधताना मंत्री संजय शिरसाट यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला. ते म्हणाले जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे थांबवावे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी सुरू केलेला लढा त्यांनी लढावा आणि जिंकावा.

वैयक्तिक टीका आणि पक्षीय राजकारणात त्यांनी पडू नये. अन्यथा त्यांच्यावर होणारी टीका सहन करण्याची त्यांनी तयारी ठेवावी, अशा शब्दात शिरसाट यांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला. पुढे ते म्हणाले, जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की त्यांनी आरक्षणावरच बोलावे आणि लढावे. राजकीय टीका किंवा वैयक्तिक टीका केल्यास त्यांना जशासतसे उत्तर दिले जाईल.

काही नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांचे मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यापासून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून संजय शिरसाट यांनी जात पडताळणी समितीवर दबाव आणत मराठा-कुणबी जातीचे सरकारनेच दिलेले प्रमाणपत्र रद्द करायला लावल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता.

अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून सुरू केलेले उपोषण तसेच पाटोद्यातील समाजाला उद्देशून केलेल्या भाषणात देखील जरांगे पाटील यांनी संजय शिरसाट यांच्यावर कडाडून हल्ला चढवला होता. पाटोद्यात 19 व्या दिवशी आपले उपोषण स्थगित करत सरकारला 90 दिवसांची मुदत दिल्यानंतर जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या दरम्यान, माध्यमांशी बोलताना काल जरांगे पाटील यांनी मिशाला ताव देत एकनाथ शिंदे यांची शान या पठ्ठ्याने आणि मराठा समाजाने वाढवल्याचा दावा केला होता. जरांगे पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार अर्जून खोतकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नये, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज संजय शिरसाट यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT