

Nagpur ZP Schools News: कॉक्रोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेचा भाजपच्या नेतृत्वातील नागपूर जिल्हा परिषदेने चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातील जीर्ण आणि मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या 250 जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मिशन संजीवनी’च्या माध्यमातून या शाळांचे नूतनीकरण केले जाणार असून, त्यासाठी तालुका आणि पंचायत समिती स्तरावरून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
कॉक्रोच जनता पक्षाने ‘स्कूल ठीक करो’ ही मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, इमारतींची अवस्था, संगणक, डिजिटल सुविधा, अग्निसुरक्षा आणि क्रीडा सुविधा आणि इतर मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात येत आहे. त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागपूर जिल्ह्यातीलही तब्बल 1509 जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या मोहिमेअंतर्गत मराठवाडा विभागातील शाळांची पाहणी केल्यानंतर अभिजीत दिपके यांनी विदर्भाकडे मोर्चा वळवला. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या 1509 शाळांमध्ये पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी तपासणीही केली होती. यात नागपूरमधील काही सरकारी शाळेच्या पाहणींदरम्यान खराब स्वच्छतागृहे, तुटलेली छते, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि वर्गखोल्यांची कमतरता आढळल्याचे आरोप केले होते.
आता नागपूरमध्ये शाळांच्या दुरुस्तीकरणासाठी हालचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यातील जीर्ण आणि मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या २५० जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मिशन संजीवनी’च्या माध्यमातून या शाळांचे नूतनीकरण केले जाणार असून, त्यासाठी तालुका आणि पंचायत समिती स्तरावरून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यामुळे कागदावर सुविधा असल्याची नोंद करण्यापेक्षा प्रत्यक्ष शाळेतील परिस्थिती सुधारण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.
नागपूर जिल्हा परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार, ‘मिशन संजीवनी’साठी गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागपूर आणि काटोल तालुक्यातील पेठ कालडोंगरी आणि मेटपांजरा येथील शाळांमध्ये या उपक्रमाचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला होता. याच धर्तीवर इतर शाळांमध्ये कामे करण्यात येणार आहेत.
मिशन संजीवनीमध्ये शाळांच्या वर्गखोल्यांची रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणांना प्राधान्य दिले जाणार आहे. समग्र शिक्षा जिल्हा परिषद नागपूरचे कार्यकारी अभियंता राकेश वाघमारे यांच्या माहितीनुसार, प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.
नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय होमग्राउंड मानले जाते. अशा ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर 250 शाळांच्या नूतनीकरणाची घोषणा झाली आहे. त्यामुळे अभिजीत दिपकेंच्या आक्रमक आंदोलनाचा हा परिणाम आहे का? सरकारने आंदोलनाचा धसका घेतला का? की आधीपासूनच नियोजित असलेल्या प्रक्रियेला आता वेग देण्यात आला? असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.