BJP MLA Babanrao Lonikar  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा समाज पुन्हा आक्रमक; आमदार बबनराव लोणीकरांना गावाच्या वेशीवरच रोखलं

Manoj Jarange Patil : 'सगेसोयरे' या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे.

Ganesh Thombare

Maratha Reservation News: मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात एकमताने मंजूर झाले. मात्र, यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम असून, 'सगेसोयरे' या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या या मागणीवर अधिवेशनात कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाची दिशा ठरवली आहे. (Maratha Reservation)

आता गावागावांत आंदोलन करण्यात येणार आहे. 'सगेसोयरे' या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. या गावागावांतील आंदोलनामुळे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनाही गावबंदीचा सामना करावा लागला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी मंत्री बबनराव लोणीकर हे दौऱ्यावर असताना मराठा समाजाने त्यांना गावात प्रवेश करण्यापासून मज्जाव केला. मंठा तालुक्यातील पोखरी या गावामध्ये त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. बबनराव लोणीकर यांना गावकऱ्यांनी गावात प्रवेश करण्यापासून मज्जाव केल्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये बबनराव लोणीकर यांना गावाच्या वेशीवरच गावकऱ्यांनी आडवल्याचं दिसत आहे. या वेळी गावाच्या वेशीवर एकत्र येत गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'आरक्षण आमच्या हक्काचं...', अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर बबनराव लोणीकर यांनी गाडीच्या खाली उतरत गावकऱ्यांशी काही वेळ चर्चा केल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठा मोर्चा काढला होता. यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ज्यांची कुणबी नोंद आहे, त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. तसेच ज्यांच्याकडे कुणबी नोंद नाही. त्यांना 'सगेसोयरे'च्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती.

ही मागणी मान्य करत राज्य सरकारने 'सगेसोयरे' याबाबत अधिसूचना जारी केली होती. यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं मुंबईतील आंदोलन मागे घेतले, पण आता 'सगेसोयरे' या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना पुन्हा एकदा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT