Congrees In Marathwada News
Congrees In Marathwada News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : `भारत जोडो`सोबतच काँग्रेस जोडो देखील व्हायला हवे..

सरकारनामा ब्युरो

नांदेड : काँग्रेसला उभारी आणि भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला समाजवादी विचारांचा पर्याय देण्यासाठी राहुल गांधी यांनी `भारत जोडो` यात्रा सुरू केली. यातून काय साध्य व्हायचे ते होईलही. पण, आज मराठवाडा आणि विदर्भातील १९ जिल्ह्यांपैकी १६ जिल्ह्यांत गटबाजीमुळे काँग्रेसच काँग्रेसचा मोठा विरोधक बनला आहे. जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणीही गटबाजीची पाळेमुळे घट्ट आहेत. त्याचाच फटका पक्षाला बसत आहे. त्यामुळे भारत जोडोसह `काँग्रेस जोडो` याचा अधिक विचार राहुल यांना करावा लागणार आहे.

औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी पण, येथे (Congress) काँग्रेसकडे राज्यपातळीवरील सोडाच जिल्ह्यात प्रभाव असलेला मोठा नेता नाही. वर्ष २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीही पक्षाकडे चेहरा नाही. (Rahul Gandhi) जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या वारंवार उठत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीला शहरातील पूर्व, पश्चिम, मतदार संघात पक्षाला उमेदवारही मिळाला नव्हता. (Marathwada)

वरिष्ठ पदाधिकारी फक्त व्यासपीठावर खुर्च्या बळकावण्यापुरते उरले आहेत. डॉ. काळे यांची `एकला चलो रे`ची भूमिका असल्याने इतर पदाधिकारी सध्या सक्रिय नाहीत. काळे आणि कार्यकर्ते असे जणू दोन गट आहेत. त्यामुळे काँग्रेसची अवस्था `मोठे घर पोकळ वासा` अशी झाली आहे. जिल्ह्यात संघटना वाढत नाही.

अशीच परिस्थिती शेजारच्या बीड जिल्ह्यात देखील पहायला मिळते. बीड जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि डावे पक्ष प्रबळ होते. पण, नंतर गोपिनाथ मुंडे यांनी भाजपचे संघटन वाढवले. आज डाव्याकडे कार्यकर्तेही नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर असलेले क्षीरसागर, आडसकर, पंडित ही मंडळी पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर या जिल्ह्यात काँग्रेस कुमकुवत झाली.

गट-तट वाढले. पक्ष नेतृत्वाने रजनी पाटील यांना दोनदा राज्यसभेवर संधी दिली. पण, पक्ष वाढीला त्याचा जिल्ह्यात काडीचाही उपयोग झालेला नाही. उरल्या-सुरल्या काँग्रेसला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रसातळाला घालण्याच्या प्रयत्नात आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवविल्या. काँग्रेस लोकसभेलाही नाही आणि विधानसभेलाही लढला नाही. मग पक्ष चिन्ह तरी लोकांच्या ध्यानी कसे राहील?

उस्मानाबादमध्ये पाटील आणि चव्हाण

उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मरगळ आली. या पक्षात नव्याने ऊर्जा निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या नाही. जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत काँग्रेस केंद्रस्थानी होती. माजी आमदार बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण यांनी आपापले मतदारसंघ सांभाळत जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवली होती. पण, विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते पराभूत झाले. निवडणुकीतील पराभवातून पाटील आणि चव्हाण अजूनही सावरलेले नाहीत. उमरगा, मुरूम, तुळजापूर तालुक्याव्यतिरिक्त वाशीमध्ये काही प्रमाणात काँग्रेसची शक्ती होती.

पण, वाशीचे नेते व तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे शिवसेनेत डेरेदाखल झाल्याने तिथेही काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले. चव्हाण आणि पाटील यांच्यातही फारसा एकोपा नाही. अमित देशमुख आणि बसवराज पाटील यांच्यातही‌‌ शीतयुद्ध आहे. तिकडे हिंगोली जिल्ह्यात राजीव सातव होते तेव्हाही हिंगोलीत गटबाजी होती, आताही आहे. हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणात भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे वजन वाढू लागले. आमदार डॉ. प्रज्ञा सातव आणि गोरेगावकर हे दोघेही सगळे काही `ओके` असल्याचे दाखवत असले तरी त्यात तथ्य नाही. आमदार सातव‌ यांच्याशी असलेल्या शीतयुद्धामुळेच माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवबंधन बांधले. वर्ष २०१४ मध्ये ते कळमनुरीचे आमदार होते.

दोन आमदार तरीही जालन्यात मरगळ

जालना जिल्ह्यात कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे विधानसभा आमदार आहेत. परंतु, मध्ये ते नाराज होते. त्यांचेही तळ्यात-मळ्यात होते. मंठ्याचे राजेश राठोड यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली.‌ पण, जिल्ह्यातील पक्ष संघटनेत त्याचा फायदा दिसत नाही. भाजप, शिवसेना (दोन्ही गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीनही पक्षाच्या तुलनेत दोन‌ आमदार असतानाही पक्षाला जिल्ह्यात मरगळ आहे.

आमदार राठोड यांच्या मंठ्यात शिवसेना प्रबळ आहे. आमदार गोरंट्याल यांनी जालना शहर आणि विधानसभा मतदार संघात काँग्रेस टिकून ठेवली आहे. मात्र, शहर वगळता जिल्ह्यात काँग्रेसची ताकद नाही. नाही म्हणायला माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया हेही परतूरमध्ये किल्ला लढवत आहेत. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या भोकरदन तालुक्यात काँग्रेस वाढली नाही.

नांदेड-लातूरमध्ये रिमोट कंट्रोल

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी लातूर-नांदेड जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी नाही. लातूरमध्ये ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख, अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा शब्द कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना अंतिम आहे; तसेच वर्चस्व नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचे आहे. नांदेडमध्ये चव्हाण तर लातूरमध्ये देशमुख कुटुंबीय यांच्याकडेच पक्षाचा रिमोट कंट्रोल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT