Vijayrao Gavhane Sarkarnama
मराठवाडा

Vijayrao Gavhane: मराठवाड्यात दुष्काळाचे भीषण संकट; अशोक चव्हाण यांनी आता तरी तोंड उघडावे! गव्हाणे यांनी केली 'ही' मागणी

Marathwada Drought News: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी जायकवाडीच्या डाव्या-उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची आणि लोअर दुधनातून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची मागणी केली.

सरकारनामा ब्यूरो

Marathwada Drought News: मराठवाड्यात एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे भीषण संकट निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे शेतकरी, पशुधन आणि सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना शासन आणखी किती दिवस हातावर हात धरून बसणार? असा संतप्त सवाल उपस्थित करत जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी केली आहे.

यासंदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. मराठवाड्यात सध्या कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू होण्याची वेळ आली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शासनाने केवळ परिस्थितीचा आढावा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असल्याचे गव्हाणे यांनी निवेदनात नमूद केले.

शेतातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी होण्याची शक्यताही धूसर झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असून शेती व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे हात रिकामे असताना जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था कशी करायची, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जायकवाडी धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडल्यास मराठवाड्यातील शेतीला मोठा दिलासा मिळू शकतो.

रब्बी हंगामाची पेरणी वाचविण्यासोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागू शकतो. मात्र, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडावे. तसेच लोअर दुधना धरणामध्ये जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत तातडीने नियोजन करावे, अशी आग्रही मागणी माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी केली आहे.

आता आश्वासन नको, प्रत्यक्ष पाणी हवे

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा हातातोंडाशी आलेला रब्बी हंगामही हातचा जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिक गंभीर होईल. त्यामुळे जलसंपदा विभागाने वेळकाढूपणा न करता तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका गव्हाणे यांनी मांडली आहे.

अशोक चव्हाण यांनी आता तरी तोंड उघडावे

मराठवाड्यात पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता तरी या प्रश्नावर तोंड उघडावे. किमान नांदेड जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी तरी त्यांनी पुढाकार घेऊन आपली भूमिका मांडावी, अशी विनंती माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी केली आहे. राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाणीप्रश्नावर मौन सोडून शासनाकडे ठामपणे बाजू मांडावी. नांदेडच्या पाण्यासाठी तरी त्यांनी आवाज उठवावा, अशी अपेक्षा गव्हाणे यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT