Marathwada Graduate MLC Election 2026 Sarkarnama
मराठवाडा

Marathwada News: मराठवाडा पदवीधरमध्ये ४१ उमेदवार रिंगणात; महाविकास आघाडीत ठाकरे-पवारांचे स्वतंत्र उमेदवार, फटका कुणाला?

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे स्वतंत्र दोन उमेदवार असल्याने याचा कोणाला कसा फटका? बसणार हे २७ रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. ठाकरेंनी नवा ओबीसी चेहरा देत निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण या पक्षाची ताकद विखुरली गेल्याने त्यांचा प्रभाव फारसा दिसत नाही.

Jagdish Pansare

Marathwada Politics : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सतीश चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. मागील तीन निवडणुकांमधील विजय आणि यंत्रणा राबवण्याचा दांडगा अनुभव या जोरावर सतीश चव्हाण विजयी चौकाराचा दावा करत आहेत.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीत बिघाडी होऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे स्वतंत्र उमेदवार मैदानात असले तरी आम्ही महायुतीला धक्का देऊ, असा दावा त्यांचे नेते करत आहेत.

अमरावती, पुणे शिक्षक मतदारसंघातील घडामोडी आणि महायुतीतील तानातानीचा प्रयत्न इतर ठिकाणी होऊ नये यासाठी राज्य पातळीवरील नेते करत असले तरी स्थानिक पातळीवर युतीमध्ये गोंधळ सुरू आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून बंडखोराला पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करत संजय शिरसाट यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये सतीश चव्हाण यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

या सगळ्या घडामोडी सुरू असल्या तरी या मतदारसंघात तीन टर्म सलग आमदार असलेले सतीश चव्हाण विरुद्ध महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवखे उमेदवार डाॅ. प्रतापसिंह पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे असे चित्र आहे.

महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सतीश चव्हाण यांनी पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी आणि मराठवाड्याचे दौरे सुरू केले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची मतदारांशी संपर्काची दुसरी फेरी सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या उमेदवाराचा प्रचार...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डाॅ. प्रतापसिंह पाटील याचा प्रचार आता कुठे दिसू लागला आहे. कधी काळी सतीश चव्हाण यांच्यासाठी निवडणूक यंत्रणा राबवणारेच माजी मंत्री राजेश टोपे, फौजिया खान व इतर नेते पाटील यांची निवडणूक यंत्रणा हाताळत आहेत. तर युतीचे सतीश चव्हाण ज्या पद्धतीने तालुक्यांमध्ये जाऊन थेट संस्थाचालकांच्या भेटी घेत आहेत, त्याच पद्धतीने प्रतापसिंह पाटील व त्यांची यंत्रणा धावपळ करताना दिसत आहे. अर्थात प्रचाराला अवघे सात दिवस उरले असल्यामुळे त्यांची झेप कुठपर्यंत जाते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाकरेंचा उमेदवार टिकणार का?

महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे स्वतंत्र दोन उमेदवार असल्याने याचा कोणाला कसा फटका? बसणार हे २७ रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. ठाकरेंनी नवा ओबीसी चेहरा देत निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण या पक्षाची ताकद विखुरली गेल्याने त्यांचा प्रभाव फारसा दिसत नाही. शिवसेनेचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरे हे पदवीधरांच्या गाठीभेटी घेत आहेत.

काँग्रेस म्हणते आमची मते आघाडीलाच..

मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार दिले आहेत. यानंतर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? याबद्दल विचारणा केली जात होती. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुष्काळी मोर्चाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली.

आमची मते आघाडीच्या दोन्ही उमेदवारालाच मिळतील. ज्या उमेदवाराची निवडून येण्याची शक्यता अधिक आहे, त्याला पहिल्या पसंतीची मते, तर ज्याची शक्यता कमी वाटते, त्याला दुसऱ्या पसंतीची मते देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT