Mahayuti Politics  Sarkarnama
मराठवाडा

Mahayuti News : मराठवाड्यात जागांवरून होणार महायुतीमध्ये तांडव; मित्रपक्षांच्या मतदारसंघावर डोळा !

Political News : मराठवाड्यातील महायुतीच्या जागावाटपात जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अनेक जागांवर मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला.

Sachin Waghmare

Chhatrpati Sambhajinagr News : आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यातच निवडणूक तोंडावर असल्याने महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाची चर्चा जोरात सुरु आहे. मराठवाड्यातील महायुतीच्या जागावाटपात जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अनेक जागांवर मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात या जागांवरून वाद रंगण्याची शक्यता आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 46 पैकी 22 जागा शिवसेनेने लढल्या होत्या. त्यापैकी 12 आमदार निवडून आले होते. तर दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या उभ्या फुटीनंतर तीन आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर राहिले. तर मराठवाड्यातून नऊ आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर गेले. त्यामुळे मुंबईनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केली होते. (Mahayuti News)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने लोकसभेच्या आठ जागापैकी तीन जागा जिंकल्या आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाला केवळ छत्रपती संभाजीनगरची एकच जागा राखता आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात महायुती मोठ्या प्रमाणात बॅकफुटवर आल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यांत शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद आहे. त्यामुळे या चार जिल्ह्यातील जागांवर शिंदे गटाकडून मोठया प्रमाणात दावा केला जाईल, असे वाटत होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती असताना मराठवाड्यातील 46 पैकी 22 जागा शिवसेनेने लढल्या होत्या. मात्र, आता होत असलेल्या महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाच्या वाट्याला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद (पश्चिम), औरंगाबाद (मध्य) या शहरी दोन मतदारसंघांत संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल हे दोन आमदार, तर रमेश बोरनारे, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार या पाच आमदारांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुमरे यांच्या पाठीशी ताकत उभी केली, ते निवडून आले. त्यामुळे येत्या काळात या विद्यमान आमदाराला उमेदवारी मिळेल मात्र जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या चार मतदारसंघावरील दावा त्यांना सोडवा लागण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील तीनपैकी दोन आमदार शिंदे गटासोबत आहेत तर एक आमदार ठाकरे गटासोबत आहे. धाराशिव मतदारसंघ मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच परंडा मतदारसंघात तानाजी सावंत यांना पाठबळ देण्यासाठी दौरा करणार आहेत. त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे संतोष बांगर, नांदेडचे बालाजी कल्याणकर अशा नऊ आमदारांच्या मतदारसंघात त्यांनी ताकद लावली आहे. त्यामुळे या नऊ जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे.

गेल्यावेळेस शिवसेनेने लढलेल्या 22 जागा मात्र त्यांना मिळणार की नाही या बाबत नाना शंका व्यक्त केल्या जात आहेत. 2019 साली पार पडलेल्या निवडणुकीमध्ये जालना जिल्ह्यातील घनसावंगी व जालना या दोन मतदारसंघात शिवसेनेने ताकद लावली होती. जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर हे उमेदवार आहेत, तर घनसावंगी पुन्हा हिकमत उडाण निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे या दोन जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे.

नांदेडमध्येही हेमंत पाटील वगळता अन्य ठिकाणी सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. देगलूर बिलोली मतदारसंघात काँग्रेसमधून जितेश अंतापूरकर यांना भाजपने प्रवेश दिला आहे. परभणीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाला फारशी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याशिवाय मराठवाड्यात परभणी, लातूर, बीड या जिल्ह्यांमधील 16 मतदारसंघांत मुख्यमंत्र्यांना जागावाटपात बोलणी करण्यास फारशी संधी नाही.

बीड जिल्ह्यातील एका जागेवर शिवसेनेचा दावा आहे. या ठिकाणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते. मात्र ते आता अपक्ष लढण्याची तयारी करत आहेत. राजकीय ताकद असणाऱ्या उमेदवारांचा शिंदे गटाकडून शोध सुरू आहे. याठिकाणी अजित पवार गट मैदानात उतरू शकतो. त्यामुळे मराठवाड्यातील जागावाटपात मुख्यमंत्री शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT