Chttrapati Sambhajinagar News : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालाची 'री' ओढली. हा निकाल देताना नार्वेकर यांनी शिवसेनेची घटना, निवडणूक आयोगाच्या निरीक्षणाचे दाखले देत एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे शिक्कामोर्तब केले. या निकालानंतर ठाकरे गटामध्ये संतापाचे वातावरण होते.
उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देतानाच जनतेच्या न्यायालयात जाऊन वस्तुस्थिती मांडण्यासाठी मंगळवारी मुंबईच्या वरळी येथे महापत्रकारपरिषद घेतली. वकिलांची फौज आणि नार्वेकर यांनी कसा चुकीचा निर्णय दिला, याची चिरफाड या माध्यमातून करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आव्हान देत जनतेच्या न्यायालयातच आपल्याला आता न्याय मिळेल, असे ठणकावून सांगितले.
एकूणच विरोधात गेलेल्या निकालावर उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब या नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि महापत्रकारपरिषद घेऊन राज्यातील हा निर्णय देशपातळीवर पोहोचवण्यात यश मिळवले. विधानसभाध्यक्षांनी ठाकरेंच्याविरोधात निकाल दिल्यानंतर पक्ष आणखी खिळखिळा होणार, कुंपणावर असलेले आमदार, ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी लवकरच शिवसेनेत दाखल होणार, असे दावे शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून केले जात आहेत.
मात्र महापत्रकारपरिषद आणि यात मांडलेल्या मुद्द्यांमुळे उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जोरदार मास्टरस्ट्रोक लगावल्याची चर्चा राज्याच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात होत आहे. आधी पक्ष फुटला नंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावही गेले, त्यामुळे राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला प्रचंड सहानुभूती मिळाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वर्षभर चाललेल्या सत्तासंघर्षानंतर विधानसभाध्यक्षांचा निकाल सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने लागणार ही जी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होती ती नार्वेकरांनी खरी करून दाखवली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती काहीपटींनी वाढल्याचे चित्र राज्यभरात आहे. लोकसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या असताना नार्वेकरांनी ठाकरे गटाबद्दल दिलेला निकाल हा त्यांच्या पथ्यावरच पडण्याची अधिक शक्यता आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav thackrey) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी त्याचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी येईल की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. असे झाले तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला अनपेक्षित यश मिळू शकते, याचा सारासार विचार करून गेल्या सहा महिन्यांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असलेली चलबिचल आता थांबली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरेंची शिल्लक सेना आणि त्यांचे आमदार येत्या 30 जानेवारीपर्यंत आमच्या पक्षात येतील, असा दावा केला आहे. परंतु कालच्या महापत्रकारपरिषदेनंतर बदललेले वातावरण पाहता शिरसाट यांचा हा दावा फोल ठरण्याची शक्यताच अधिक दिसते.
(Edited by Sachin Waghmare)
R...