MGNREGA Payments | Kalyan Kale Protest | Farmers' Dues Sarkarnama
मराठवाडा

MGNREGA Payments : चार वर्षांपासून शेतकऱ्यांचे पैसे अडकले! काँग्रेस खासदाराचा पंचायत समितीसमोर ठिय्या

MGNREGA pending payments : शासनाच्या रोजगार हमी योजनेवर विश्वास ठेवून शेतात विहिरी, शेततळी, गोठे आणि फळबागांची कामे पूर्ण केली; मात्र चार वर्षांपासून हक्काची देयकेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत मनरेगाअंतर्गत पूर्ण झालेल्या वैयक्तिक लाभाच्या कामांची कुशल घटकाची देयके अद्याप थकीत आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar, 28 Nov : मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे, सरकारी मदतीचा अजून पत्ता नाही, त्यातच गेल्या चार वर्षापासून मनरेगाची चार वर्षाची देयकेच शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा आरोप करत काँग्रेसने पंचयात समितीसमोर ठिय्या दिला. खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती कार्यालयासमोर काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले होते.

शासनाच्या रोजगार हमी योजनेवर विश्वास ठेवून शेतात विहिरी, शेततळी, गोठे आणि फळबागांची कामे पूर्ण केली; मात्र चार वर्षांपासून हक्काची देयकेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत मनरेगाअंतर्गत पूर्ण झालेल्या वैयक्तिक लाभाच्या कामांची कुशल घटकाची देयके अद्याप थकीत आहेत. या देयकांच्या मागणीसह दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करावीत, यासाठी शुक्रवारी (ता. २७) काँग्रेसच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीमंत उकिर्डे, कार्याध्यक्ष विठ्ठल कोरडे, विनोद देहाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. मनरेगाअंतर्गत शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, शेततळी, फळबाग व वृक्षलागवड तसेच घरकुलांची कामे पूर्ण केली. त्यासाठी अनेकांनी उसनवारी आणि उधारीवर पैसे उभे केले.

कामे पूर्ण होऊनही कुशल घटकाची देयके मिळाली नसल्याने कर्जाची परतफेड करणेही कठीण झाले आहे. योजनेची कामे पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःच्याच हक्काच्या पैशांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. थकीत देयकांचा तालुकानिहाय आणि लाभार्थीनिहाय आढावा घेऊन निधी तातडीने वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली.

जलसंधारणाला प्राधान्य द्या..

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी 'व्हीबी-जी राम जी' योजनेंतर्गत नाला खोलीकरण, नाला बांध, शेततळी, पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत मुरविणे आदी कामांचा कालबद्ध आराखडा तयार करावा. तसेच अधिकाधिक वैयक्तिक लाभाची कामे हाती घेऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT