Atul Save
Atul Save Sarakarnama
मराठवाडा

Atul Save in Action : लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात विरोधकाला लीड; मंत्री अतुल सावे 'अलर्ट' मोडवर!

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election Result and Atul save : लोकसभा निवडणुक निकालाने महायुतीला धक्का बसला आहे. मराठवाड्यातील आठ पैकी केवळ फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला यश मिळाले. या मतदारसंघात शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांनी सव्वा लाखांहून अधिक मताधिक्याने विरोधी उमेदवार एमआयएमचे इम्तियाज जलील यांना धूळ चारली.

मात्र महायुतीला संभाजीनगरमध्ये यश मिळाले असले तरी शहरातील पुर्व आणि मध्य या दोन मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना लीड मिळाली आहे. यामुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा पुर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांना झटका बसला आहे.

सहा महिन्याने होणाऱ्या विधानसभेत हेच चित्र राहिले तर आमदारकी धोक्यात येईल या धास्तीने ते आतापासूनच कामाला लागले आहेत. आपल्या छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) पूर्व मतदारसंघातील रखडलेली कामे वेगाने कशी मार्गी लागतील यासाठी त्यांनी आढावा बैठकांचा धडका लावला आहे.

सध्या शहरात नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मुख्य व अंतर्गत पाइपलाइन टाकण्याची कामे सुरू आहेत. पाइपलाइन, ड्रेनेजची कामे झाल्याशिवाय रस्ता करू नये, असे आदेश महापालिकेने काढले आहेत.

त्यामुळे विधानसभेच्या पूर्व मतदारसंघात 19 रस्त्यांची कामे रखडली आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करून रस्त्यांचा मार्ग मोकळा करावा, अशी सूचना गृहनिर्माणमंत्री अतुल सावे(Atul Save) यांनी मंगळवारी (ता. 11) महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांना केली.

पूर्व विधानसभा मतदारसंघात परिजातनगर, केटली गार्डन, शिवाजी महाराज ग्राउंड येथे पाण्याच्या टाकीची कामे सुरू आहेत. या टाक्यांची कामे पूर्णत्वाकडे असल्यामुळे अंतर्गत जलवाहिन्या देखील टाकल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांची कामे करण्यात येऊ नयेत. रस्त्यांची कामे केल्यास पाइपलाइन, ड्रेनेजलाईनसाठी रस्ते पुन्हा फोडले जातात.

त्यामुळे जलवाहिनी, ड्रेनेजची कामे केल्यानंतरच रस्त्यांची कामे करावीत, असे आदेश महापालिकेने काढले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अतुल सावे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली.

यावेळी पूर्व विधानसभा मतदार संघातील आमदार निधीतील 19 रस्ते जलवाहिनीच्या कामांसाठी रखडले असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले. त्यामुळे लवकरात लवकर अंतर्गत जलवाहिनी टाकून, रस्त्यांची कामे सुरु करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.

मतदारसंघातील तीन जलकुंभ 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत, अशी डेडलाईन सावे यांनी यावेळी दिली. या मुदतीत कामे पूर्ण होतील, असे आश्‍वासन कंत्राटदार कंपनीतर्फे देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा निवडणूकीसाठी आता काही महिन्यांचाच वेळ शिल्लक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पूर्व मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गृहनिर्माण मंत्री सावे अलर्ट मोडवर गेले आहे. मंगळवारची बैठक त्याचाच एक भाग असल्याची चर्चा सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT