Kailas Gorantyal Sarkarnama
मराठवाडा

MLA Kailas Gorantyal News : अशोक चव्हाणांची ताकद नांदेड पुरतीच, त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही...

Political News : अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला काही फरक पडणार नाही.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : काँग्रेस पक्ष हा समुद्रासारखा मोठा आणि अथांग आहे. त्यामुळे समुद्रातून एक-दोन लोटे पाणी काढून घेतल्याने जसा त्याला फरक पडत नाही, तसेच अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला काही फरक पडणार नाही. चव्हाण यांच्यासोबत फक्त नांदेडमधील त्यांचे समर्थक जातील, एकही आमदार जाणार नाही, असा दावा जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला.

मुंबईत काँग्रेस आमदारांच्या बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत 12 ते 15 आमदार भाजपमध्ये जातील, अशी चर्चा राज्यभरात होत आहे. परंतु त्यांचेच एकेकाळचे सहकारी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मात्र अशोक चव्हाण यांची ताकद फक्त नांदेडमध्ये होती, त्यामुळे तिथलेच त्यांचे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत जातील. काँग्रेसचा एकही आमदार त्यांच्यासोबत जाणार नाही, असा दावाही गोरंट्याल यांनी केला.

काँग्रेसच्या बैठकीला 40 पेक्षा जास्त आमदार हजर राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात या बैठकीला 7 आमदार गैरहजर राहिल्याचे समोर आले होते. दरम्यान, कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश केलेल्या माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनाही टोला लगावला.

राज्यसभेच्या उमेदवारीचा शब्द त्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यांना ती मिळाली नाही, तेव्हा त्यांची अवस्था आता बाबा ही गेल्या अन् दशम्याही गेल्या, अशी झाल्याची खिल्ली गोरंट्याल यांनी उडवली. मुलाच्या राजकीय भविष्याचा विचार करून त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परत यावे, असा सल्लाही गोरंट्याल यांनी या वेळी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांबद्दल काहींना यायला उशीर झाला, काही लग्न-कार्यात अडकले आहेत, अशी कारणे देत गोरंट्याल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. गेल्यावेळी विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे (Chandrakanat Handore) यांचा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे पराभव झाला होता, याची आठवण करून दिली असता, पक्षाने त्यांना आता राज्यसभेवर संधी देत न्याय दिल्याचेही गोरंट्याल म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT