Prakash Solanke, K. Chandrashekhar Rao
Prakash Solanke, K. Chandrashekhar Rao Sarkarnama
मराठवाडा

MLA Prakash Solanke : चर्चा तर होणारच! आमदार सोळंकेंची 'त्या' वक्तव्यानंतर केसीआर यांची भेट

पांडुरंग उगले

MLA Solanki meets KCR : माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षांतराबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर आज शनिवारी (ता. ४) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांचीही त्यांनी भेट घेतली. यामुळे आमदार सोळंके खरच पक्षांतर करणार, की चर्चेत राहून पक्षावरील दबावतंत्रासाठी करण्यात येणारी राजकीय खेळी आहे, याबाबत माजलगाव मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.

मराठवाड्यातील (Marathwada) नामांकीत पाच राजकीय घराण्यामध्ये माजलगावचे सोळंकी घराणे आहे. या घराण्याची माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय सुंदरराव सोळंके (Sundarrao Solanke) यांच्यामुळे ओळख आहे. एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा निवडून येत नाही हा इतिहास प्रकाश सोळंकी यांनी मोडून काढला. ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत. सोळंकी यांनी चार टर्म आमदारकी भूषवली आहे. सोळंके घराण्याचा नावलौकिक असला तरी, राज्याच्या राजकारणात मात्र पक्षश्रेष्ठींकडून पाहिजे तेवढी संधी त्यांना मिळालेली नाही.

२०१४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार येऊनही आमदार सोळंके यांना केवळ अडीच वर्ष मंत्रीपदाची संधी मिळाली. २०१४ मध्ये मोदी लाटेत आमदार सोळंके यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरही त्यांनी जनतेशी असलेली नाळ कधीच तोटू दिली नाही. त्याचे फळ म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना पुन्हा एकदा आमदार केले.

योगायोगाने राज्यातही काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार (MVA) स्थापन झाले. यामुळे या सरकारमध्ये आमदार सोळंके यांना निश्चित मंत्रिपद मिळणार, असा विश्वास त्यांच्यासह मतदारसंघातील नागरिकांनाही होता. मात्र मंत्रिमंडळ घोषणेच्या यादीत त्यांचे नाव आलेच नाही.

नव्याने पक्षात आलेले अन् राजकारणात ज्युनिअर असलेले परळीचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिपद दिले. बीडचे पालकमंत्रीही केले. त्यामुळे उद्विग्न होऊन आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा करत मुंबई गाठली होती. त्यांच्या या राजीनामास्त्राने पक्षश्रेष्ठी खडबडून जागे झाले. त्यांची वरिष्ठांनी समजूत काढत हा निर्णय मागे घ्यायला लावला.

राष्ट्रवादीत १५ वर्षे राहून काम केल्यानंतरही सत्तेच्या सात वर्षात आमदार सोळंके यांना पाहिजे ती संधी मिळालेली नाही. राज्यात शिंदे, फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आमदार सोळंके पक्षांतर करणार असल्याच्या चर्चेने वेग धरला होता. यातच एका पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेची इच्छा असेल तर भाजपच काय शिंदे गट एव्हाना तेलंगणाच्या के.सी.आर. (KCR) यांच्या बीआरएस पक्षातही जाण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले होते. नुकतीच त्यांनी शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे आमदार सोळंके पक्षांतर करणार का, या चर्चेला आणखीनच उधाण आले आहे.

खरच पक्षांतर का दबावतंत्र?

पत्रकार परिषदेतील वक्तव्य, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याची घातलेली भेट यामुळे आमदार सोळंके हे खरच पक्षांतर करणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच तोंडावर आलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अध्यक्षपद शाबूत ठेवण्यासाठी दाबतंत्र आहे, अशीही चर्चा रंगू लागली आहे. सध्या उलटसुलट चर्चा रंग लागल्या असल्यातरी ते नक्की काय निर्णय घेणार, याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT