Sanjay Shirsat On ministerial Post News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News: संजय शिरसाट यांची साडेसाती संपेना! खात्यातील गैरव्यवहाराची मनसेची थेट फडणवीसांकडे तक्रार!

MNS demand Inquiry Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्याची चौकशी करण्याची मागणी मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता मुख्यमंत्री याची दखल घेणार का?

Jagdish Pansare

Shivsena-MNS News : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची साडेसाती काही केल्या सुटत नाही. सिडकोतील जमीनीच्या गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जंगजंग पछाडले, मुंबईत मोर्चा काढला, पुरावे म्हणून फायलींचे गठ्ठेच्या गठ्ठे दिले. पण तरी शिरसाट यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही संजय शिरसाट यांच्या खात्यात अनियमितता, गैरव्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सामाजिक न्याय विभागातील अनियमितता , प्रशासकीय घोटाळा, निधी वाटप , संशयास्पद निविदा प्रक्रिया व त्यांच्या कार्यालयातील काही अधिकार्‍यांच्या कामकाजावर गंभीर आरोप करत लिहिलेल्या पत्रात अविनाश जाधव यांनी तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी या पत्राद्वारे केली आहे. विधिमंडळांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हे पत्र आल्याने आता मुख्यमंत्री याची दखल घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव भरत कदम यांच्यावरही जाधव यांनी आपल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. या शिवाय शिरसाट यांचे ओएसडी म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा संशय जाधव यांनी व्यक्त केला आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, सामाजिक न्याय विभागात अलीकडील काळात काही गंभीर अनियमितता समोर येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

टक्केवारीची मागणी

विशेषतः विविध योजनांमधील निधी वितरण प्रक्रियेत घोळ, विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि वस्तीगृहाशी संबंधित कामांमध्ये ऑनलाईन टेंडर प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामांचे वाटप झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. शिरसाट यांच्या कार्यालयाचा वापर करून काही कामे देताना आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींना टक्केवारीची मागणी केली जात असल्याचा आरोपही जाधव यांनी आपल्या पत्रात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल चौकशी करावी, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.

शिरसाट का ठरत आहेत वादग्रस्त?

संजय शिरसाट यांच्यावर गेल्या वर्षभरात विविध आरोप करण्यात आले. जमीन व्यवहार, आर्थिक अनियमितता, तसेच वैयक्तिक वाद अशा अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी शिरसाट यांच्यावर टीका करत चौकशीची मागणी केली. मात्र शिरसाट यांनी हे सर्व आरोप राजकीय हेतूने केलेले असल्याचे सांगत फेटाळले आहेत.

प्रकरणांची पडताळणी

रोख पैशांनी भरलेल्या बॅगेच्या कथित व्हिडिओचे प्रकरण, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून शिरसाट यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, छत्रपती संभाजीनगरमधील जमीन व्यवहारावराचा आरोप, शेंद्रा एमआयडीसी परिसरातील पाच एकर जमीन नियमबाह्य पद्धतीने मिळविल्याचा आरोप, या सगळ्या प्रकरणांची पडताळणी करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे सादर

आमदार रोहित पवार यांनीही सिडकोच्या जमीन वाटप प्रकरणांमध्ये पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. शिरसाट यांच्या संपत्तीवाढीबाबत प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवल्याची माहितीही समोर आली होती. शिरसाट यांनी स्वतः याची कबुली देत आवश्यक कागदपत्रे सादर केल्याचे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT