Beed Political News : बीड जिल्ह्यात मोठे ओबीसी नेते होऊन गेले. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे, केशरकाकू क्षीरसागर, बबनराव ढाकणे यांच्यासारख्या नेत्यांनी जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात ओबीसींचे नेतृ्त्व केले आहे. त्यामुळे बाहेरच्या कोणाची, तुमची आम्हाला गरज नाही, अशा शब्दात बीडचे खासदार बंजरंग सोनवणे यांनी लक्ष्मण हाके यांना सुनावले.
गेवराई येथे काल लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि आमदार विजयसिंह पंडीत यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. हाके यांच्या गाडीवर दगडफेक, चप्पल भिरकावण्यात आली. त्याला हाके यांच्या समर्थकांनी दंड थोपटत आव्हान दिले. हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा नेते, शरद पवारांकडून रसद पुरवली जात असल्याचा आरोप केला. तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी, व्हावे, असे आव्हान दिले.
या सगळ्या विषयावर खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी 'साम' टीव्ही शी बोलताना उत्तरे दिली. लक्ष्मण हाके हे बीडमध्ये येऊन वातावरण बिघडवत आहेत. त्यांना दंगल घडवायची आहे का? राहिला प्रश्न माझा राजीनामा मागण्याची तर तो अधिकार बीडच्या जनतेला निश्चित आहे. कोण्या एैऱ्या-गैऱ्याचा नाही, अशा शब्दात हाके यांना सोनवणे यांनी ठणकावले. बीड जिल्ह्यात दहशत, दादागिरीचे वातावरण पहिल्यापासूनच आहे. आता काही बाहेरची लोक येऊन लोकप्रतिनिधीवर बोलत असतील तर ते योग्य वाटत नाही.
बीडच्या सुसंस्कृत जिल्ह्याला शोभणारी ही घटना नाही. दांड्याची भाषा बोलणारे त्यांच्यावर हे संस्कार असतील त्यावर मी काही बोलणार नाही. मराठा आंदोलनाला रसद पुरवणारा अजून कोणी मायचालाल पैदा झालेला नाही. मराठा नेत्याने कुठलाही पैसा दिलेला नाही, कोणाकडून चहाही घेतलेला नाही. सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे हे काम हाती घेतली आहे. मी जिल्ह्याचा खासदार आहे, उद्या मुंबईला लोक जाणार आहे, परंतु माझ्याकडे आतापर्यंत कोणीही मदत मागीतलेली नाही.
लोक स्वयंभूपणे काही मदत करतात, कोणी पाण्याची व्यवस्था करतं तर कोणी आणखी काही. पंढरपूरच्या वारकऱ्यांची जशी सेवा लोक निस्वार्थपणे करतात, तसंच लोक समाजासाठी करतात. मराठा नेत्यांचा एक रुपयाही या आंदोलनाला दिलेला नाही, असेही बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला रसद पुरवण्याचा प्रश्नच येत नाही, कोणी मागतच नाही, तर पुरवायची कोणाला ? कोणी एक रुपयाची अपेक्षा करत नाही. ज्याना आंदोलन करण्यासाठी रसद घेण्याची सवय आहे, त्याच्यांच मनात हा विचार येऊ शकतो, असा टोलाही सोनवणे यांनी हाकेंना लगावला.
माझा राजीनामा बीडची जनता मागेल..
बीड जिल्ह्यातील जनतेला माझा राजीनामा मागण्याचा रास्त अधिकार आहे. कोणीही येईल आणि राजीनामा मागेल हे योग्य नाही. मला निवडून देणाऱ्या लोकांना जेव्हा वाटेल की याला मतदान करून चुकू झाली तर ते आम्हाला बोलू शकतात, राजीनामा मागू शकतात. एैऱ्या- गैऱ्याचे हे काम नाही. आमच्या जिल्ह्यात ओबीसीचे नेतृत्व आहे, तुमची गरज नाही. गोपीनाथ मुंडे, केशरकाकू, बबनराव ढाकणे यांच्यासारखे ओबीसी नेते आमच्याकडे होऊन गेले. या जिल्ह्याने ओबीसी खासदारही निवडून दिले आहेत. आम्ही काय करावं याची आम्हाला अक्कल आहे. त्यामुळे तुम्हाला माझा राजीनामा मागयचा अधिकार आहे का? असा सवालही सोनवणे यांनी केला.
तुम्ही बाहेरून येऊन बीडमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करतायं. तुमचाच या आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न दिसतो. उगाच आरोप करायचे आणि बदनामी करायची असाच यांचा प्रयत्न दिसतो. पण माझ नांव गोवण्याचा प्रयत्न केला तर मी उत्तर देईन. हे आंदोलन मराठा समाजाचं आहे, समाजाचा घटक म्हणून मी आंदोलनात सहभागी झालो. जेव्हा अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला तेव्हा पासून मी प्रत्येक आंदोलनात सहभागी झालो. आताही मी 29 तारखेला आझाद मैदानात नक्की असेल, असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.