Nanded BJP Politics Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP News : खासदार चिखलीकर 'ॲक्शन मोड'मध्ये; म्हणाले, चव्हाण-खतगावकरांनी लावली नांदेडची वाट

Laxmikant Mule

Nanded BJP News : नांदेड लोकसभेची भाजपची जागा डेंजर झोनमध्ये आहे, विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांविरोधात मतदारसंघात नाराजी आहे, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहेत. त्यांना पक्षांतर्गत विरोध असल्याचेही बोलले जाते. या सगळ्या चर्चा, टीकांकडे दुर्लक्ष करीत चिखलीकरांनी आगामी लोकसभेत दुसरा विजय मिळवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगांवकर यांच्यावर निशाणा साधत चिखलीकरांनी दंड थोपटले आहेत. कॉंग्रेसच्या काळात राजयोग असलेल्या अशोक चव्हाण व भास्कर पाटील खतगावकर या दाजी-भावजींनी जी कामे केली नाहीत, ती माझ्या कार्यकाळात झाली, असा दावा चिखलीकरांनी केला. जे माझ्यावर आरोप करतात त्यांनी काय उद्योग केले. हे सर्वसामान्यांना माहित आहे, असे म्हणत चिखलीकरांनी चव्हाण-खतगावकरांवर तोफ डागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील कॉंग्रेसच्या काळात दाजी-भावजी यांच्याकडे मंत्रीपदे चालून आली. परंतू त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणावे तसे योगदान दिले नाही. माझ्या कार्यकाळात रेल्वे, रस्त्याच्या कामांसाठी मी पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या कार्यकाळात नांदेड शहराला पाईपलाईन द्वारे गॅस देण्याची योजना राबवली जाणार आहे. मी माझ्या कार्यकाळात केलेल्या कामामुळे समाधानी आहे.

येणारी लोकसभेची निवडणूक मीच लढवणार असून शंभर टक्के जिंकणार, असा दावाही चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार आल्यास मागील 25 वर्षात न झालेली कामे मतदारसंघात करून दाखवेन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जिल्ह्यात प्रत्येकाच्या घरी अयोध्येतून आलेल्या अक्षता वाटपाचे काम चालू आहे. 22 जानेवारी रोजी होणार्‍या या दीपोत्सवासाठी 2 लाख दिवे देणार आहे.

नांदेड मधील जुना मोंढा भागात पुरातन राम मंदिरात कारसेवकांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही चिखलीकर यांनी दिली. नांदेडच्या नागरिकांनी देशात नोंद होईल, असा दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहनही चिखलीकरांनी केले. नांदेड लोकसभेची जागा मीच लढवणार व जिंकणार याचा पुनरुच्चार करत मागच्या निवडणुकी पेक्षा चारपट अधिक मतांनी अशोक चव्हाण यांचा पराभव होईल, असा दावाही चिखलीकरांनी केला.

Edited by : Chaitanya Machale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT