Shivsena Political News : वाईन शाॅप खरेदी करताना कुठेही अनियमितता केलेली नाही, शासकीय शुल्क भरून ते घेतलेले आहेत. यात कुठलाही गैरप्रकार, भ्रष्टाचार नाही. व्यवसाय करणे हा काही गुन्हा नाही, पण विरोधक वारंवार हा मुद्दा पुढे करतात. ज्याने आरोप केले तो व्यक्ती कायम आमच्या विरोधात खोटे आरोप करत असतो. याआधी त्याने केलेल्या आरोपाचे काय झाले? हे त्याला विचारले पाहिजे, अशा शब्दात खासदार संदीपान भुमरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी केलेले आरोप फेटाळले.
माझी तक्रार लोकायुक्त, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष कोणाकडेही करू द्या, मी काही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे अशा आरोपांकडे लक्ष देत नाही, असेही (Sandipan Bhumre) भुमरे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे खासदार संदीपान भुमरे हे राज्यात मंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर करत पत्नी, सूनेच्या नावाने वाईन शाॅपचे परवाने खरेदी केले.
कोट्यावधीचा व्यवहार मनीलाॅन्ड्रींगच्या माध्यमातून झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. लोकसभेची निवडणूक लढवताना दिलेल्या शपथपत्रात भुमरे यांनी स्वतःची, पत्नी, मुलाच्या संपत्तीची खोटी माहिती दिली. दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने भुमरे यांनी प्लाॅट, जमीनी खरेदी केल्याचा आरोप गोर्डे यांनी केला.
वाईन शाॅपचे परवाने खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रुपये भुमरे यांनी आणले कुठून? याची चौकशी करण्याची मागणी गोर्डे यांनी लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत केली. (Shivsena) या विषयावर संदीपान भुमरे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा आरोप करणारी व्यक्ती ही खोटारडी आहे. यापुर्वी पैठणमध्ये माझा कोट्यावधी रुपयाचा प्लाॅट असल्याचा, तसेच माझ्या साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने केला होता. पण त्यात काहीच तथ्य आढळून आले नाही.
खोटे आरोप करायचे, पत्रकारांची, लोकांची दिशाभूल करायची एवढात त्याचा धंदा आहे. खरतर त्याने माझ्यावर आधी केलेल्या आरोपाचे काय झाले? हे त्याला विचारायला पाहिजे. पैठणमधून विधानसभा निवडणूक लढवू पाहणाऱ्या या व्यक्तीचा पराभव अटळ आहे. पराभव होणार या भितीमुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, त्या निराशेतून हे खोटे आरोप त्याने केले आहे. त्यावर मला उत्तर देण्याचीही इच्छा नाही.
मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप माझ्यावर त्याने केला, मी कुठे शासकीय अनुदान लाटले का ? मी व्यवसाय करू शकत नाही का? शासकीय फी भरून नियमाने जर मी व्यवसाय करत असेल तर यांना पोटदुखी का होते? असा सवाल संदीपान भुमरे यांनी केला. विधानसभा निवडणूक लढवायची असल्यामुळेच संबंधित व्यक्तीने माझ्याविरोधात आरोप केले आहेत. निवडणुका आल्या की आरोप करायचे आणि आपला हेतू साध्य करायचा, एवढाच यांचा उद्योग असल्याचेही भुमरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.