तब्बल चार दशकांपासून भाजप विचारसरणीच्या विरोधात आणि पुरोगामी विचारांचा वारसा चालवत अशोक चव्हाण यांनी राजकारण केले. या कालावधीत ते दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री, दोन वेळा खासदार होते. शिवाय काँग्रेस पक्षात मोठ्या पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यानंतरही त्यांनी काँग्रेसला 'हात' दाखवून भाजप प्रवेश केला, पण आता भाजप प्रवेशामुळे अशोक चव्हाण यांना काही तोटेही सहन करावे लागणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम मतदार अशोक चव्हाण यांच्यामुळे काँग्रेससोबत भक्कपणे उभा होता. त्यांनी आता चव्हाणांपासून दूर राहणे पसंत केले आहे.
काही वर्षांपूर्वी एमआयएममुळे (AIMIM) मुस्लिम व्हाेट बॅंक काँग्रेसपासून दूर गेली होती. नांदेड-वाघाळा महापालिकेत मोठ्या प्रमाणात एमआयएमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर भविष्यातले धोके ओळखत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एमआयएमचा बंदोबस्त केला. त्यामुळे काँग्रेसची पारंपरिक व्हाेट बॅंक पुन्हा अशोक चव्हाणांनी खेचून आणली होती. परंतु ज्या मुस्लिम मतदारांची भक्कम साथ अशोक चव्हाण यांना त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात मिळाली, तेच मतदार आता चव्हाण यांना 'हात' दाखवण्याच्या तयारीत आहेत.
भाजपसोबत गेल्यामुळे चव्हाणांना किती राजकीय लाभ झाला, होणार हे येणाऱ्या काळात दिसून येईलच. पण त्यासोबतच भाजपमध्ये गेल्याचा काही प्रमाणात तोटाही चव्हाण यांना सहन करावा लागणार आहे. काँग्रेस समर्थकांचे दररोज भाजपमध्ये प्रवेश सोहळे सुरू असले तरी यात चव्हाण यांच्या मुस्लिम समर्थकांची संख्या नगण्य असल्याचे दिसून आले आहे. भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा शतप्रतिशत भाजप (BJP) करण्याची जबाबदारी घेतली आहे.
नांदेड मुक्कामात काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा अशोक चव्हाण यांनी सपाटा लावला आहे. पण या प्रवेश सोहळ्यापासून मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी आणि नगरसेवकांनी दूर राहणे पसंत केले आहे. भाजपची विचारधारा आणि भूमिका अद्याप मुस्लिम मतदारांमध्ये रुजलेली नाही. भाजपने मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण यात त्यांना फारसे यश आले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांची धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून ओळख होती. त्यामुळे मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळला होता. नांदेड शहरातील मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला आणि अशोक चव्हाण यांना वेळोवेळी साथ दिली. गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे बहुतांश मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड शहरात अशोक चव्हाण तळ ठोकून होते. त्यांनी आपल्या नांदेडच्या मुक्कामात नांदेड-भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर, मुदखेड, भोकर या तिन्ही तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे.
तसेच देगलूर बिलोली या भागातील कार्यकर्त्यांनी गळ्यात भाजपचा दुप्पटा घातला आहे. नांदेड शहरात हे पक्ष प्रवेश सोहळे झाले, पण या सोहळ्यात मुस्लिम नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुठेच दिसले नाही. (Latest Marathi News)
R
नांदेड शहरातील सामाजिक समीकरणे पाहाता मुस्लीम आणि दलितांची संख्या खूप मोठी आहे. नांदेड शहरातील राजकारणात जम बसवायचा असेल तर मुस्लीम आणि दलितांची साथ मिळणे आवश्यक मानले जाते. पण हे दोन्ही समाज घटक भाजपपासून चार हात दूरच आहेत.
नांदेड महापालिकेची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली आहे. जेव्हा महापालिकेची निवडणूक होईल तेव्हा अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाची कसोटी लागेल. लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर गेल्या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारांने एक लाख साठ हजार मते घेतली होती. ही मते काँग्रेससाठी गेम चेंजर ठरू शकतात.
अशोक चव्हाण यांनी तोच विचार व तोच विश्वास हे धोरण स्वीकारून वाटचाल सुरू केली आहे. भाजप श्रेष्ठींना संपूर्ण नांदेड जिल्हा भाजपमय करून दाखवण्याचा दिलेला शब्द पूर्ण करायचा असेल तर अशोक चव्हाणांना जिल्ह्यातील मुस्लीम नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनाही त्यांच्याकडे वळवावे लागेल.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.