Naldurg Muncipal corporation  Sarkarnama
मराठवाडा

Naldurg municipal election: नळदुर्ग नगरपालिकेतील निकालाने काळजाचा ठोका चुकला! अवघ्या एका मताने बाजीच पलटवली

BJP mayor win News : नळदुर्ग नगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत महिला उमेदवाराने केवळ एक मताने विजयी होत गुलाल उधळला. तर दुसरीकडे चार, पाच, आठ व बारा मताच्या फरकाने चार उमेदवार विजयी झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : नळदुर्ग नगरपालिकेची निवडणूक मोठी चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएम अशी चौरंगी झाली. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज धरणे 420 मताने विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदाळे, एमआयएमचे शहबाज काझी व राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बताले यांचा पराभव केला. दुसरीकडे या निवडणुकीत भाजपचे दहा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक तर काँग्रेसचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक सहामधील महिला उमेदवार केवळ एक मताने विजयी होत गुलाल उधळला. तर दुसरीकडे चार, पाच, आठ व बारा मताच्या फरकाने चार उमेदवार विजयी झाले आहेत.

नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतमोजणी पार पडली. या वेळी नगरसेवकपदाच्या निवडणुकीत एका मताची किंमत काय असते हे एका प्रभागातील निकालाने दाखवून दिले आहे. त्याशिवाय चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीत अन्य तीन प्रभागातही चार, पाच आठ व दहा मताच्या फरकाने चार उमेदवार विजयी झाल्याने काहीकाळासाठी काळजाचा ठोका चुकला होता.

सकाळी दहा वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर एकानंतर एक धक्कादायक निकाल लागत गेले. प्रभाग क्रमांक सहामधील काँग्रेसच्या (Congress) महिला उमेदवार मन्नबी कुरेशी यांना 405 मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार तयबा कादरी यांना 404 मते पडली. त्यामुळे केवळ एक मताने विजयी झालेल्या मन्नबी कुरेशी यांनी गुलाल उधळला. यावेळेस मतदान यंत्रावर एक-दोन वेळेस परत मोजणी करण्यात आली. मात्र, आकडयात काहीच बदल झाला नसल्याने कुरेशी यांना विजयी घोषित करण्यात आले.

मतमोजणीवेळी सुरुवातीलाच प्रभाग क्रमांक एकची मोजणी करताना याठिकाणी तीन वेळेस नगरसेवक राहिलेले भाजपचे (BJP) उमेदवार निरंजन राठोड यांना 584 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दत्ता राठोड यांना 580 मते मिळाली. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे निरंजन राठोड केवळ चार मताच्या फरकाने विजयी झाले. तर याच प्रभागातील महिलांच्या लढतीत भाजपच्या छमाबाई राठोड यांना 535 मते मिळाली तर काँग्रेसच्या रेश्मा पवार यांना 527 मते मिळाली. या ठिकाणी छमाबाई राठोड यांनी निसटत्या आठ मताने विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक दोनच्या मतमोजणीवेळीही निवडणूक चुरशीची असल्याचे पुढे आले. या प्रभागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार सुमन ठाकूर यांना 569 मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील काँग्रेसच्या उमेदवार मुशरबी शेख यांना 564 मते मिळाली. या ठिकाणी केवळ पाच मताच्या फरकाने सुमन ठाकूर या विजयी झाल्या. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्रावर एकच जल्लोष केला.

त्यानंतर प्रभाग क्रमांकमधील चार मध्येही काँग्रेसचे आकाश कुलकर्णी, भाजपचे सुशांत भूमकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बताले यांच्यात चुरशीची लढत झाली. या ठिकाणी काँग्रेसचे आकाश कुलकर्णी यांना 376 तर भाजपचे सुशांत भूमकर यांना 364 मते पडली. या दोघांमध्ये ही केवळ बारा मताचे अंतर आहे. या ठिकाणी काँग्रेसचे कुलकर्णी विजयी झाले. या निवडणुकीतील या चार चुरशीच्या लढतीची चर्चा नळदुर्ग परिसरात चांगलीच रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT