Nana Patole Sarkarnama
मराठवाडा

Nana Patole : नाना पटोलेंनी सांगितला भाजप-आरएसएसचा अजेंडा; काँग्रेस शेवटपर्यंत त्याविरोधात लढणार!

Nana Patole criticises News : दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी सरकारने मान्य केली नसल्याचा आरोप करत, नागपूर अधिवेशनात काँग्रेस शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

Jagdish Pansare

Congress Politics : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप-आरएसएसवर गंभीर आरोप केला. देश तोडण्याचा या दोघांचा अजेंडा असल्याचे सांगत काँग्रेस शेवटपर्यंत याविरोधात लढणार, असा इशारा पटोले यांनी दिला. नांदेडमधून पटोले यांनी राज्य सरकारच्या योजना, फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेली सक्तीची वसुली, डिलिमिटेशन, दुष्काळ या मुद्यावरूनही सरकारवर टीका केली.

नांदेड येथे माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्या सरकारवर हल्ला चढवला. खासदार-आमदारांची संख्या वाढवण्याचा मुद्दा, मतचोरीचे आरोप, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची परिस्थिती, मायक्रो फायनान्समधील कथित वसुली आणि भ्रष्टाचार अशा अनेक विषयांवर त्यांनी सरकारला घेरलं. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी सरकारने मान्य केली नसल्याचा आरोप करत, नागपूर अधिवेशनात काँग्रेस शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

जातीपातींमध्ये वाद, भेद निर्माण करून भाजप आणि आरएसएस हे देश तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे मनसूबे आम्ही उधळून लावू, असा इशाराही पटोले यांनी दिला. खासदार आणि आमदारांच्या संख्येच्या मर्यादा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलेल्या होत्या, त्या बदलण्याचा प्रयत्न म्हणजे संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप, पटोले यांनी भाजपकडून डिलिमिटेशन बील येत्या अधिवेशनात आणून ते मंजूर करण्याच्या हालचालीवर बोलतांना केला.

लोकप्रतिनिधींच्या संख्येत वाढ झाल्यास त्याचा आर्थिक भार जनतेवर पडेल. या निर्णयाला काँग्रेस कधीही समर्थन देणार नाही, असे पटोले म्हणाले. भाजपावर मतचोरीचा आरोप करत २ कोटी १७ लाख मते कोणाची गायब झाली, याचे उत्तर भाजप आणि निवडणूक आयोग देत नसल्याचे म्हटले आहे. निवडणुक मतदाना दरम्यानचे फुटेज आम्ही मागत आहोत. सातत्याने त्याचा पाठपुरावा केला जात असताना ते फुटेज काँग्रेसला का दिले जात नाही? असा सवालही पटोले यांनी केला. हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हानही पटोले यांनी दिले.

महाराष्ट्र कर्जबाजारी

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला नसून मूठभर लोकांना राज्य लुटण्याची संधी दिल्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावत असल्याचा आरोप. योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी केली, महागाईमुळे महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा फायदा कमी होत असल्याचे पटोले म्हणाले. संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिला आणि वृद्धांना वेळेवर पैसे मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

नव्या जमीन कायद्यावरूनही पटोले यांनी भाजपला इशारा दिला. बावनकुळे यांनी आणलेला कायदा नवीन नसल्याचे सांगताना दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या सामान्य शेतकऱ्यांवर या कायद्याचा परिणाम होऊ नये. धनदांडग्यांनी हजारो एकर जमीन घेतली असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यास विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आदिवासींच्या जमीनी बळकावल्याचा आरोप केला. यावर या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी केली. सरकारच्या अखत्यारीतील SIT ऐवजी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी एल्गार

नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काँग्रेस मोर्चा काढणार असल्याचे पटोले यांनी जाहीर केले. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तीन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी सरकारने मान्य केली नाही, असा आरोपही पटोले यांनी केला. मायक्रो फायनान्स कंपन्यांमध्ये सरकारमधील जबाबदार लोकांची भागीदारी असल्याचा आरोप करताना कर्जवसुलीच्या नावाखाली नागरिकांची लूट होत असून मायक्रो फायनान्समधील कथित अत्याचार थांबवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. या शिवाय विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस पक्ष शेतकरी, बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई, कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलणार आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT