Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Nanded Congress News : अशोक चव्हाणांनी मोठे केलेले पदाधिकारीच आता त्यांना देणार आव्हान!

Laxmikant Mule

Nanded Congress Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर मराठवाड्यातील काँग्रेसला अवकळा आली आहे. त्यात उरलीसुरली काँग्रेस संपवण्यासाठी भाजपकडून निकराचे प्रयत्नही सुरू आहेत. अशावेळी नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने नव्याने केलेली संघटनात्मक बांधणी पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरणार हे येणाऱ्या काळात दिसेल. गेली चार दशके नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस अशोक चव्हाण यांच्या हाती सोपवण्यात आली होती.

त्यामुळे चव्हाणांनी जिल्ह्यात दुसरे नेतृत्वच उभे राहू दिले नाही. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर बसत आहे. सध्या जे आमदार, पदाधिकारी पक्षात आहेत, त्यांनी आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द ही चव्हाणांच्या नेतृत्वात घडवली आहे.

काही अपरिहार्य कारणांमुळे किंवा भविष्यातील राजकारण डोळ्यांसमोर ठेवून ते आज काँग्रेससोबत आहेत, तर मनाने अशोक चव्हाणांसोबत(Ashok Chavan ) आणि तनााने काँग्रेसमध्ये अशी काहींची अवस्था झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना टक्कर देऊ शकेल, असा एकही नेता काँग्रेसकडे आज घडीला जिल्ह्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशोक चव्हाण यांनी तयार केलेली कार्यकारिणी बरखास्त करून काँग्रेसने नवीन कार्यकारिणी निवडली आहे.

पण ती जाहीर करताना पक्षाने सावध पावलं उचलल्याचेही दिसत आहे. जी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती प्रभारी आहे. याचाच अर्थ निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांवरही काँग्रेस नेतृत्वाला पूर्ण विश्वास नाही, असेच यावरून स्पष्ट होते.

या नवनियुक्त कार्यकारिणीत प्रथमच दोन जिल्हाध्यक्ष व पाच कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे पक्षाने जो प्रयत्न केला आहे तो कितपत यशस्वी होईल, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जातो.

नांदेड उत्तरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले बी.आर. कदम या आधीही जिल्हाध्यक्ष होते. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राहिलेले कदम अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना जिल्ह्यध्यक्ष म्हणून होते. त्यांनी जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर चांगले काम केले आहे.

त्यांना 2015 मध्ये पक्षाने भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित केली होती, पण ऐनवेळी अमिता चव्हाण यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. ते गेल्या पाच वर्षांत पक्षात असूनही दुर्लक्षित होते.

ते पक्ष सोडून जाणार अशा वावड्या अधूनमधून उठत होत्या, पण अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यावरही ते काँग्रेसमध्येच राहिले. त्याचे फळ त्यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या रूपाने पुन्हा मिळाले. नांदेड उत्तर मध्ये भोकर, किनवट, हादगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात.

या तीन मतदारसंघांपैकी भोकर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला आहे. किनवट भाजपकडे तर हादगाव काँग्रेसकडे आहे. या तीन विधानसभा मतदारसंघात बी. आर. कदम यांना काम करावे लागणार आहे.

नांदेड दक्षिण मध्ये नांदेड उत्तर, नायगाव मुखेड देगलुर, कंधार हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या पाचपैकी दोन काँग्रेस, दोन भाजप (BJP) व एक शेकापकडे आहे. या भागाची जबाबदारी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या भागात भाजपचे बळ असून, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांची साथ त्यांना मिळणार आहे. अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढत बेटमोगरेकरांना काम करावे लागणार आहे. नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यातील सर्व पदाधिकारी हे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठे झाले आहेत.

या सर्वांची अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे. ‌त्यामुळे हे पदाधिकारी अशोक चव्हाण यांच्यासारख्या सक्षम नेत्याला कशी टक्कर देतात? हे पाहावे लागेल. ज्या नेत्याने पक्षात संधी दिली, त्यांच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहून काम करणे या सगळ्यांनाच अवघड जाणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT