Nanded Political News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेस कमकुवत झाली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रभारी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या बुडत्या जहाजाला किनाऱ्याला लावण्याची जबाबदारी माजी आमदार हानुमंतराव पाटील बेटमोगरेकर व माजी सभापती बी. आर. कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला पाच कार्याध्यक्षांची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी (ता. 11) नियुक्ती पत्र देण्यात आले.
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने काँग्रेसला धक्का दिला. या अनपेक्षित धक्क्यातून काँग्रेस कशीबशी सावरत आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षा नाना पटोले यांनी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिल पटेल यांना नांदेडला गेल्या महिन्यात पाठविले होते. या निरीक्षकांकडे संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी तातडीने बरखास्त करून नवीन कार्यकारिणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याप्रमाणे कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर जिल्हाध्यक्षपदी कोणाची नेमणूक होणार याची उत्सुकता होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या आदेशानुसार नवीन प्रभारी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात प्रथमच दोन प्रभारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून, नांदेड उत्तरच्या अध्यक्षपदी बी. आर. कदम यांची, तर दक्षिणच्या जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार हानुमंत पाटील बेटमोगरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या सोबत पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात पप्पू पाटील कोंढेकर, राजेश पावडे, शमीम अब्दुला, सुभाष राठोड, गंगाधर सोंडारे यांचा समावेश आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अध्यक्ष व कार्याध्यक्षांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या सोबत खूप वर्षे काम केले आहे.
आता त्यांना अशोक चव्हाण व भाजपशी दोन हात करून पक्षाला उभारी द्यावी लागणार आहे. यातील बी. आर. कदम यांना संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून दहा वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे. (Latest Political News)
हानुमंतराव पाटील बेटमोगरेकर (Hanmantrao Patil Betmogrekar) हे मुखेडचे असून त्यांचा देगलूर-बिलोली, नायगाव या विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यांचे बंधू दिलीप पाटील बेटमोगरेकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासाठी पप्पू पाटील कोंढेकर यांनी जिल्हा युवक काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद हे दहा वर्षांहून अधिक काळ सांभाळून संघटनात्मक पातळीवर काम केले आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.