Nanded DCC Bank News : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार आता तीन टर्म आमदार राहिलेल्या डॉ. तुषार राठोड यांच्या हाती आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनंतर खासदार अशोक चव्हाण यांनी राठोड यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली.
गेल्या अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आता कुठे जिल्हा बँक रुळावर येऊ लागली आहे. बँकेची खालावलेली आर्थिक प्रकृती नव्याने अध्यक्ष झालेले डॉक्टर तुषार राठोड सुधारतात का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे. राठोड यांची अध्यक्षपदावर झालेली ही निवड महत्त्वाची मानली जाते. पारदर्शक कारभारावर भर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू आमदारांच्या हाती बँकेची सूत्रे सोपवली आहेत. त्यामुळे भविष्यात नांदेड जिल्हा बँकेला राज्यस्तरावरून मोठी मदत मिळू शकते.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना 1923 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देणे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना वित्तपुरवठा, ग्रामीण भागात बचत व ठेवींच्या सवयीला चालना, कृषी यांत्रिकीकरणासाठी कर्ज, शेतीपूरक व्यवसायांना वित्तपुरवठा, ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवणे व शासनाच्या कृषी व सहकार योजनांची अंमलबजावणी नांदेड जिल्हा बँक आपल्या 64 शाखांच्या माध्यमातून करते.
2024-25 मध्ये सभासदांची संख्या मागील वर्षापेक्षा कमी झाली असली तरी 442 कोटींपेक्षा जास्त पीक कर्जवाटप बँकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने 20 ऑक्टोबर 2005 रोजी बँकेवर नवीन ठेवी स्वीकारण्यावर आणि खात्यांमधून पैसे काढण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आणल्या होत्या.
या काळात बँकेवर आर्थिक गैरव्यवस्थापन आणि निधीच्या गैरवापराबाबत आरोप झाले होते. 2011 मधील महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या एका प्रकरणातही बँकेच्या आर्थिक संकटामुळे व्यवहारांवर RBI निर्बंध आणले होते. अशा प्रकारे अनेक चढउतार पाहत बँकेची वाटचाल सुरू आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली.
2007 मध्ये राज्य सरकारने सुमारे 20 कोटी भागभांडवल देण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर बँकेच्या SLR आणि पुनरुज्जीवनासाठी 100 कोटींचे कर्ज देण्यात आले. हे कर्ज सुरुवातीला 6 टक्के व्याजदराने देण्यात आले होते. नंतर राज्य सरकारने काही आर्थिक मदत अनुदानात रूपांतरित केली.
31 मार्च 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांत बँकेतील ठेवी, गुंतवणूक, कर्ज येणे, नेटवर्थ आणि CRAR यामध्ये महत्त्वपूर्ण बदल दिसून आले आहे. 2024-25 मध्ये बँकेच्या ठेवी 117 कोटींनी वाढल्या. 771 कोटींच्या ठेवी 2025 मध्ये 888.95 कोटींवर पोहोचल्या आहेत. ही समाधानाची बाब असली तरी बँकेला आणखी खूप मोठी झेप घ्यावी लागणार आहे.
दोन वर्षांत बँकेच्या कर्ज येणे रक्कम 146 कोटींनी वाढली आहे. बँकेच्या कर्जपुरवठ्यातही चांगली वाढ गेल्या काही वर्षांत झाली आहे. बँकेचा संचित तोटा शून्य झाला असला तरी NPA चे मोठे आव्हान नव्या अध्यक्ष आणि संचालक मंडळासमोर असणार आहे. उपलब्ध माहितीनुसार 31 मार्च 2025 रोजी बँकेचा एकूण NPA हा 130 कोटी 41 लाख होता. त्यामुळे बँकेसमोर थकीत कर्जाची वसुली आणि NPA कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.