

Nanded BJP News : नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मुखेडचे भाजप आमदार डॉ. तुषार राठोड यांची अखेर बिनविरोध निवड झाली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने 23 पैकी 21 जागा जिंकत वर्चस्व मिळवले होते.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी अशोक चव्हाण समर्थक बी. आर. कदम, मारोतराव कवळे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत अशोक चव्हाण सांगतील त्याला उमेदवारी अन् पद देण्यात आले.
महापालिकेच्या राजकारणातही अशोक चव्हाण यांचा प्रभाव आणि ते सांगतील तीच पूर्व दिशा, अशा पद्धतीने महापौर, उपमहापौर, सभापती पदांचे वाटप झाले होते. जिल्हा बँकेत मूळ भाजपच्या संचालकांची अध्यक्षपदावर वर्णी लागावी, अशी मागणी जिल्ह्यातून जोर धरू लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही स्थानिक नेत्यांनी तसा आग्रह धरला होता.
अखेर मुख्यमंत्र्यांनीच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी तीन टर्म आमदार असलेल्या तुषार राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची शिफारस केली. थेट मुख्यमंत्र्यांकडूनच राठोड यांचे नाव आल्यामुळे खासदार अशोक चव्हाण यांनीही ते मान्य केले.
शुक्रवारी अशोक चव्हाण यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांची आपल्या निवासस्थानी बैठक घेतली होती. या बैठकीतच राठोड यांच्या नावावर मोहर उठवण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांकडूनच अध्यक्षपदासाठीचे नाव पुढे आल्यानंतर बी. आर. कदम, मारोतराव कवळे यांची नावे मागे पडली.
उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे...
अध्यक्षपद भाजपचे आमदार तुषार राठोड यांना मिळाल्यानंतर उपाध्यक्षपद महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची स्वतंत्र बैठक झाली होती. तेव्हाच उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते.
या पदावर आमदार कन्या प्रणिता देवरे चिखलीकर यांची वर्णी लागणार, असे बोलले जात होते. पण, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष भास्कर पाटील खतगावकर यांच्या सुनबाई असलेल्या मीनल पाटील खतगावकर यांना या पदावर संधी देण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपद हे पुढील अडीच वर्षांसाठी असेल, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.