

BJP Politics : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शेतकरी विकास पॅनलची सत्ता आल्यानंतर येत्या 10 ऑगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जाणार आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी या संदर्भात नुकतीच नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेतली. आतापर्यंत बी. आर. कदम, मारोतराव कवळे ही दोन नावेच अध्यक्षपदाच्या शर्यतीत घेतली जात होती. यात आता भाजपचे आमदार डाॅ. तुषार राठोड यांच्या नावाची भर पडली आहे. त्यांच्या नावाची शिफारस थेट मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्याची चर्चा पक्षाच्या गोटातच सुरू आहे.
अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी सर्व संचालकांशी चर्चा केली, त्यांचे मत जाणून घेतले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांच्या निवडीचे अधिकार अशोक चव्हाण यांनाच देण्यात आले आहेत. अध्यक्ष पद भाजप समर्थक संचालकालाच मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे.
उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहेत. अशोक चव्हाण यांनी सर्व संचालकांशी चर्चा करण्याआधी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेत चिखलीकर स्वतः संचालक म्हणून निवडून आले आहेत, तर त्यांच्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर याही संचालक मंडळात आहेत.
23 पैकी 21 संचालक हे शेतकरी विकास पॅनलचे आहेत. यात चौदा संचालक हे भाजपशी संबंधित तर प्रत्येकी तीन संचालक हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. जिल्हा बँकेवर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीची सत्ता आल्यानंतर अध्यक्षपद याच पक्षाकडे जाणार आहे.
यात प्रामुख्याने अशोक चव्हाण यांच्या आमदार कन्या श्रीजया चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघाला ही संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये बी. आर. कदम यांचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सोमवारी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.
भाजपच्या निवडून आलेल्या संचालकांमध्ये दोन आमदार, एक आमदार पत्नी तर एका आमदाराच्या मुलीचा समावेश आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत आमदार डॉ. तुषार राठोड यांचे नाव अचानक समोर आल्याने अध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.