Avinash Bhosikar-vasant Chavan
Avinash Bhosikar-vasant Chavan Sarkarnama
मराठवाडा

Nanded VBA News : वंचितच्या भोसीकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले वसंत चव्हाण डमी..!

Jagdish Pansare

Nanded Lok Sabha Constituency : महायुती-महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पक्षांमुळे नांदेडमधील लढत तिरंगी वळणावर पोहाेचली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोचला आहे. महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर, महाविकास आघाडीचे वसंत चव्हाण आणि वंचितचे अविनाश भोसीकर यांच्यात नांदेडमध्ये लढत होत आहे.

वंचित बहुजनने महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांना टार्गेट करत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे वसंत चव्हाण हे डमी उमेदवार असल्याचा आरोप केला आहे. वसंत चव्हाण यांचा दिवसभर प्रचार करणारे लोक रात्री अशोक चव्हाणांना जाऊन भेटतात, असा दावाही भोसीकर यांनी करत जोरदार खळबळ उडवून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय चिखलीकर-चव्हाण हे पक्ष बदलू नेते असल्याची टीकाही या दोघांवर निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात होताना दिसते आहे. नांदेड (Nanded) लोकसभा मतदारसंघाची सुरुवातीला दुरंगी वाटणारी लढत वंचितने अॅड. अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर तिरंगी झाली. शिवाय प्रकाश आंबेडकर हे भोसीकर यांच्यासाठी नांदेडमध्ये सभा घेणार आहेत.

तत्पूर्वीच भोसीकर यांनी काँग्रेसच्या (Congress) वसंत चव्हाण यांच्यावर टीका करत ते डमी उमेदवार असल्याचा आरोप केला आहे. यावर काँग्रेसकडून अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होणार होती. शेवटपर्यंत त्यांचे आघाडीच्या नेत्यांशी बोलणे सुरू होते. मात्र, चर्चा लांबत असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी टप्प्याटप्प्याने आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली.

अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच या प्रक्रियेला खीळ बसली आणि वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. नांदेडमध्ये भोसीकर यांच्या उमेदवारीने वंचितही या मतदारसंघात स्पर्धेत आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या यशपाल भिंगे यांनी लाखांवर मते घेत तेव्हा काँग्रेसचे उमेदवार असलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या पराभवात सिंहाचा वाटा उचलला होता.

Edited By : Chaitanya Machale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT