Nanded Lok Sabha Constituency Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election : भाजपची डेंजर झोनमधील जागा; माजी राज्यमंत्र्याची निवडणूक लढवण्याची तयारी

Nanded Lok Sabha Constituency Madhavrao Patil Kinhalkar Statement : भाजपच्या सर्वेक्षणात डेंजर झोनमध्ये असलेली जागा लढवण्यासाठी भाजप नेत्याने दाखवली तयारी...

Laxmikant Mule

Lok Sabha Election 2024 : मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे. माझी निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. पक्षाने संधी दिली तर नांदेड लोकसभेची जागा लढविणार, असे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी गृहराज्यमंत्री माधवराव पाटील किन्हाळकर म्हणाले. ते आज एका कार्यक्रमासाठी कामठा बुद्रुक (जिल्हा नांदेड) येथे आले होते.

लोकसभेची निवडणूक चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपने तर मिशन 45 प्लसचे अभियान सुरू केले आहे. या अभियानाला नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीने अधिक बळकटी दिली आहे. या निवडणुकीत तीन राज्यांत भाजप सत्तेवर आली असून, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. ही जागा महायुतीच्या जागावाटपात भाजपला सुटणार हे निश्चित आहे. त्यामुळे या जागेवर विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना डावलून दुसऱ्यांना उमेदवारी देण्याची वेळ आली तर दुसरा सक्षम उमेदवार कोण? असेल याची चाचपणी सुरू झाली आहे. संभाव्य उमेदवारांत आमदार राजेश पवार, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, प्रणिता पाटील चिखलीकर यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

नांदेडची जागा भाजपच्या सर्वेक्षणात डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी सक्षम व विनिंग कॅप्यासिटी असलेल्या उमेदवारालाच भाजप उमेदवारी देणार हे निश्चित आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर हे एक अभ्यासू नेते म्हणून परिचित आहेत. भोकर विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढविली होती. काँग्रेसमध्ये असताना भोकर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. तसेच नांदेडचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कामठा (जिल्हा नांदेड) येथे श्रद्धांजली सभेसाठी ते आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली. माझ्या वयोमानानुसार लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी योग्य आहे. मी एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे आम्हाला पक्षाचे आदेश पाळावे लागतात. पक्षाने संधी दिली तर नांदेड लोकसभा निवडणूक लढवू, अशी माहिती त्यांनी दिली. ( Marathwada Politics News )

भारतीय जनता पक्षाला आपले मिशन 45 प्लसचे ध्येय गाठण्यासाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. त्यात नांदेडच्या जागेचाही समावेश आहे. या जागेवर काँग्रेस वगळता चार वेळा इतर पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. यात भारतीय जनता पक्षाचा दोन वेळा उमेदवार निवडून आला आहे. ही जागा खेचून आणण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भाजपही तेव्हाडाच तगडा उमेदवार देणार हे निश्चित आहे. त्यामुळे नांदेडचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असेल? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

Edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT