Osmanabad Lok Sabha Constituency : अमोघ वक्तृत्वशैली आणि स्पष्टवक्तेपणा असलेले प्रा. रवींद्र गायकवाड

Dharashiv Political News : दोन वेळा आमदार, तर एक टर्म खासदारकी गाजवली...
Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : अबालवृद्धांमध्ये रवी सर या नावाने परिचित असलेले प्रा. रवींद्र विश्वनाथ गायकवाड हे उमरगा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा (1995 आणि 2004) विजयी झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे मध्यंतरी काही काळ ते राजकीय विजनवासात गेले होते. (Latest Marathi News)

Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Shivsena - BJP : ...म्हणून साताऱ्यात शिवसेना- भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना आले उधाण!

धाराशिव लोकसभा मतदारसंघात धाराशिव, भूम-परंडा, तुळजापूर, उमरगा लोहारा या विधानसभा मतदारसंघांसह सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यांतील औसा मतदारसंघांचाही समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांची दमछाक होते. सर्वार्थाने मजबूत उमेदवाराचाच या मतदारसंघात टिकाव लागू शकतो. सध्या शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. त्या पराभवानंतर राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते तुळजापूरचे आमदार आहेत.

नाव (Name)

प्रा. रवींद्र विश्वनाथ गायकवाड

जन्मतारीख (Birth date)

27 एप्रिल 1960

शिक्षण (Education)

एम.कॉम, बी.एड.

Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मोठा गौप्यस्फोट; ‘एकही आमदार अपात्र होणार नाही...’

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

प्रा. रवींद्र गायकवाड हे मूळचे वतनदार शेतकरी कुटुंबातले. त्यांचे मूळ गाव आष्टा (जहागीर, ता. उमरगा. जि. धाराशिव) आहे. ते उमरग्यात स्थायिक आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांच्या पत्नी उषाताई गायकवाड या उमरगा पंचायत समितीच्या माजी सदस्य आहेत. मुलगा किरण हा राजकारणात सक्रिय असून, युवासेना मराठावाडा निरीक्षक म्हणून काम पाहत आहे.

प्रा. गायकवाड यांच्या कन्या विवाहित असून, त्या गृहिणी आहेत. त्यांना दोन भाऊ आहेत. मोठे बंधू व्यंकटराव गायकवाड हे जलसंपदा विभागातून प्रधान सचिव म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांचे अन्य एक बंधू मोहनराव गायकवाड हे शेतकरी आहेत. प्रा. गायकवाड हे सर्वात लहान. त्यांना दोन भगिनी होत्या, त्या आता हयात नाहीत. त्यांचे आई आणि वडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक. त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी काँग्रेसशी संबंधित आहे. त्यांच्या मातुःश्री झिंगूबाई या उमरगा पालिकेत काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. वडील अॅ़ड. विश्वनाथराव गायकवाड काँग्रेसकडून उमरगा पंचायत समितीचे सभापती होते. 1972 च्या दुष्काळात सभापतिपदाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठे काम केले होते. उमरगा येथे स्थापन झालेल्या भारत शिक्षण संस्थेचे ते सचिव होते. ही संस्था मराठवाड्यातील सर्वात जुन्या शिक्षण संस्थांपेकी एक. प्रा. गायकवाड हे वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत.

Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Dharashiv Maratha Reservation : जरांगेंच्या आवाहनानंतर धाराशिवचे अक्षय नाईकवाडींचे उपोषण स्थगित

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

प्रा. रवींद्र गायकवाड हे उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्राध्यापक होते. आता सेवानिवृत्त झालेले आहेत. शेती हाही त्यांचा व्यवसाय आहे.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

धाराशिव (आधीचा उस्मानाबाद)

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (शिंदे गट)

Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Nashik NCP Politics : शरद पवार गटाचा आता अल्पसंख्यांक घटकांत विस्तारावर भर!

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उमरगा-लोहारा (जि. धाराशिव) विधानसभा मतदारसंघातून 1995 आणि 2004 अशा दोन निवडणुकांत विजय मिळवला होता. 1999 मध्ये त्यांचा पराभव झाला. तत्पूर्वी, 1990 मध्ये त्यांनी उमरगा विधानसभा मतदारसंघातून ऐनवेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2009 मध्ये उमरगा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे शिवसेनेने 2009 मध्ये त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील विजयी झाले होते. 2014 मध्ये प्रा. गायकवाड यांना शिवसेनेने पुन्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत त्यांनी डॉ. पाटील यांच्यावर दणदणीत विजय मिळवला.

पुढच्या, म्हणजे 2019 च्या निवडणुकीत मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती. आमदार हा लोकांसाठी असतो, तो सहजपणे कुठेही उपलब्ध होऊ शकतो, हे शिवसेनेमुळे राज्यात रूढ झाले होते. शिवसेनेच्या तशा पहिल्या पिढीतील ते आमदार. ते आमदार असताना किल्लारी (ता. औसा. जि. लातूर) येथील किल्लारी सहकारी साखर कारखान्यावर युती सरकारने त्यांची प्रशासक म्हणून निवड केली होती. त्याच्या दीड वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय झाला. त्यांनी त्यावेळी उसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव दिला होता. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कारखान्याला ऊस उत्पादनवाढीचा देशपातळीवरील पहिला पुरस्कार मिळाला होता.

Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Jayakwadi Water Issue : नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष का ?

तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला होता. शिवसेनेच्या नेत्याला मिळालेला साखर कारखान्याचा अशा प्रकारचा हा पहिलाच पुरस्कार होता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचाही पुरस्कार कारखान्याला मिळाला होता. नंतर झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला. 1990 मध्ये भाजप शिवसेना युती झाली. उमरगा मतदारसंघ भाजपला सुटला. भाजपकडे उमेदवार नव्हता. त्यामुळे प्रा. गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. दोन मराठा उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतविभागणी होऊन त्यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे कै. खालिकमियाँ काझी विजयी झाले होते. प्रा. गायकवाड यांना 24 हजार, अन्य उमेदवार बलभीमराव पाटील यांना 25 हजार मते मिळाली. विजयी उमेदवार कै. काझी यांना 35 हजार मते मिळाली होती.

प्रा. रवींद्र गायकवाड हे मूळचे एस. काँग्रेसचे. 1985 मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते तटस्थ राहिले. ते भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. साधारण 1986-87 मध्ये शिवसेनेने मराठवाड्यात पाऊल ठेवले. महाविद्यालयातील काही विद्यार्थी शिवसेनेच्या संपर्कात आलेले होते. प्रा. रवींद्र गायकवाड यांची वक्तृत्वशैली अमोघ अशी आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांना शिवजयंतीच्या व्याख्यानांसाठी नेऊ लागले. ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. त्याच काळात बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरात (तत्कालीन औरंगाबाद) सभा झाली.

त्यावेळी प्रा. गायकवाड शिवसेनेकडे ओढले गेले. नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. प्रा. गायकवाड आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते अशोक सांगवे यांनी बाळासाहेबांकडे पाठपुरावा करून उमरगा-लोहारा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेतला. शिवसेनेच्या उमेदवारीवर ते 1995 मध्ये पहिल्यांदा ते आमदार झाले. भूकंपग्रस्त उमरगा-लोहारा तालुक्यांत अनेक रस्ते कच्चे होते. आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील अनेक गावे रस्त्यांनी जोडली. महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करवून घेतले. त्याच काळात कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती झाली.

Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Madha Loksabha : बावनकुळेंच्या संकेतानंतरही मोहिते पाटील ‘प्रचंड आशावादी’; धैर्यशील म्हणतात, भाजपचे तिकीट 100 टक्के मिळणार

प्रा. गायकवाड हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निकटवर्तीय होते. मतदारसंघातून कर्नाटकमध्ये जाणारे पाणी रोखण्यासाठी आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये प्रा. गायकवाड यांनी 28 साठवण तलावांची उभारणी केली. त्यामुळे मतदारसंघातील ओलिताखालील क्षेत्र वाढले, उसाचे उत्पादनही वाढले. निराधारांचे वेतन मनी ऑर्डरने टपाल कार्यालयात यायचे. ग्रामीण भागातील लोकांशी प्रा. गायकवाड यांचा थेट संपर्क होता. महिलांनी त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. मनी ऑर्डर अनेक जणांना मिळत नव्हती, काही जणांची परत जात होती. प्रा. गायकवाड यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यानंतर सरकारने निराधारांचे वेतन बँकेत थेट त्यांच्या खात्यावर करायला सुरुवात केली. भूकंपग्रस्तांना तीन टक्के आरक्षण मिळावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते.

प्रा. रवींद्र गायकवाड यांना शिवसेनेतून दोन वेळा बडतर्फ करण्यात आले होते. दोन वेळा बडतर्फ करून पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिले गेलेले ते राज्यातील एकमेव नेते आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर विधान परिषदेच्या लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसने त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात प्रा. गायकवाड यांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांना एबी फॉर्म शेवटपर्यंत देण्यात आला नाही. निवडणूक भाजपने लढवायची की शिवसेनेने याचा निर्णय अखेरपर्यंत झाला नाही. नंतर मग पक्षाने त्यांना अपक्ष लढण्यास सांगितले, त्याला प्रा. गायकवाड यांनी नकार देत अर्ज मागे घेतला. काँग्रेसला मदत केल्याचा ठपका ठेवून त्यांना बडतर्फ करण्यात आले. नंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला.

Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Amravati News : एकीकडे अधिवेशन तर दुसरीकडे अमरावतीत 4 हजारांवर अंगणवाडी सेविका संपावर

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मदत न केल्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा शिवसेनेतून बडतर्फ करण्यात आले. उमरगा लोहारा तालुक्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उमरगा - लोहारा विकास आघाडी होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आघाडीतर्फे बस या चिन्हावर लढवण्यात आली होती. आघाडीने उमरगा-लोहारा तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या 13 पैकी 12 जागा आणि पंचायत समितीच्या 26 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मदत करण्याचा शिवसेनेचा आदेश त्यांनी मान्य केला नाही. आघाडी करून काँग्रेसविरोधात निवडणूक लढवल्यानंतर अध्यक्षपदासाठी त्या पक्षाला मदत करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Dharashiv LokSabha : धाराशिव लोकसभेसाठी उमरग्यातील भूमिपुत्रांनी थोपटले दंड !

या वेळीही त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली. पुन्हा त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यामुळे त्यांनी अन्य कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला नाही. शिवसेनेतून बडतर्फ केल्याच्या काळात त्यांनी शेतीकडे लक्ष दिले. राजकारण करायचे तर फक्त शिवसेनेतेच अशी त्यांची भूमिका आहे. 2019 मध्ये उमेदवारी कापल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रा. गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सोबत राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही त्यांना संघटनेत महत्त्वाचे पद देण्यात आले नाही. त्यामुळे नंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

2004 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करायच्या आदल्या दिवशी त्यांना उमेदवारी नाकारून पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या केशव ऊर्फ बाबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. रात्री 12 च्या सुमारास प्रा. गायकवाड यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. उमरगा-लोहारा मतदारसंघात शिवसेनेने दिलेला उमेदवार निवडून येणार नाही, त्याचे खापर माझ्या डोक्यावर नको, यासाठी मला अन्य कोणत्याही मतदारसंघाची जबाबदारी द्या, मी तेथील उमेदवार निवडून आणतो, अशी भूमिका त्यांनी बाळासाहेबांसमोर मांडली. प्रा. गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याची माहिती बाळासाहेबांना नव्हती. हे ऐकून त्यांना धक्का बसला. प्रा. गायकवाड यांना उमेदवारी द्यावी, असे आदेश त्यांनी तातडीने दिले. त्यानंतर एबी फॉर्म घेऊन रातोरात मुंबईहून उमरग्यात दाखल होऊन त्यांनी सकाळी अर्ज दाखल केला होता.

Osmanabad Lok Sabha Constituency : Ravindra Gaikwad
Dharashiv Politics : धाराशिव लोकसभेत प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारीसाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरू

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

1993 मध्ये किल्लारीसह सास्तूर भागात प्रलयंकारी भूकंप झाला होता. त्यावेळी त्यांनी पहिल्या दिवसापासून मदतकार्य केले होते. मातीखाली अडकलेले मृतदेह काढण्याचेही काम त्यांनी केले होते. वारकरी संप्रदायाशी संबंधित असल्यामुळे प्रा. गायकवाड यांनी उमरगा शहरात भव्य असा नाथषष्ठी महोत्सव आय़ोजित केला होता. गावोगावी जाऊन ते सप्ताहांमध्ये प्रवचन देत असत. मतदारसंघात सामाजिक सलोखा राहावा, तो वाढीला लागावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 मध्ये शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) -निवडणूक लढवली नव्हती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

मध्यंतरी जनसंपर्क कमी झाला होता. आता त्यांनी तो वाढवला आहे. ते सहजपणे लोकांमध्ये मिसळतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सोशल मीडियावर प्रा. गायकवाड फारसे सक्रिय नसतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

खासदार असताना दिल्लीत एअर इंडियाच्या विमानात त्यांनी कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. वस्तुतः त्या कर्मचाऱ्याने प्रा. गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. त्या प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटका झाली. या व्यतिरिक्त त्यांनी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

अमोघ वक्तृत्वशैली. वक्तृत्वशैलीच्या जोरावर त्यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. कोणाशीही राजकीय वैर नाही. आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी निवडणुकीपुरतीच. निवडणूक संपली की सर्वांशी सौहार्दाचे संबंध. स्पष्टवक्तेपणा. काम होत असेल तर हो नसेल तर नाही म्हणून सांगतात. कोणालाही विनाकारण आशेला लावत नाहीत. लोकांना ते सहजपणे कुठेही म्हणजे अगदी चहाची टपरी, पानटपरीवरही उपलब्ध होतात.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

२०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारी मिळाली नव्हती, त्यामुळे मध्यंतरी त्यांचा जनसंपर्क कमी झाला होता. महत्वाकांक्षा दाखवत नाहीत.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करणार नाही. पक्ष सांगेल त्या उमेदवाराचा प्रचार करणार, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com