MLC Elections: नांदेड जिल्ह्यात निवडणूक कोणतीही असो अशोक चव्हाण कायमच किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी नांदेडमध्ये पंजा शिवाय इतर कुठलेही चिन्ह फडकू दिले नाही. आता भाजपामध्ये गेल्यानंतर हीच किमया ते साधू पाहत आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. आता नांदेड विधान परिषदेची निवडणूक आणि अमर राजरकूर यांचा विजय हे आव्हान चव्हाण यांच्यासमोर आहे.
महायुतीकडे तीनशे पार संख्याबळ असल्याचा दावा अशोक चव्हाण करतात. तर महाविकास आघाडीने ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाला पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला. विधान परिषदेत अमर राजूकर यांना बिनविरोध पाठवण्याचा अशोक चव्हाण यांचा डाव महाविकास आघाडीच्या या खेळीनेच उलटला. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुलासाठी जोर लावत आपल्या नातीगोत्याचे राजकारण सुरू केले आहे.
महायुतीकडून अमर राजूकर यांना उमेदवारी मिळवून देत अशोक चव्हाण यांनी भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय केल्याची तीव्र भावना काही पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. उघडपणे याबद्दल कोणी बोलत नसले, तरी त्याचा उद्रेक मतदानातू होऊ शकतो, अशी चर्चा आहे. महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रसे पक्षामध्ये यापेक्षा वेगळे चित्र नाही. अशोक चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेच्या तीन आमदारांना सोबत घेत 'हम साथ साथ है' चे चित्र निर्माण केले असले तरी मित्रपक्ष त्यांनी किती साथ देणार? याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.
कृष्णा पाटील आष्टीकरांचा आत्मविश्वास की ओव्हर काॅन्फीडन्स?
अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील मोठे नेते आहेत, त्यांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्यासमोर मी खूप लहान असल्यामुळे त्यांच्यावर मी बोलने योग्य ठरणार नाही, अशी संयमित भाषा वापरणारे महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. भाजपाच्या आमच्याकडे तीनशे पार मतदार असल्याच्या दाव्याची ते खिल्ली उडवत आहेत. माझ्याकडे मॅजिक फिगर असताना त्यांच्याकडे तीनशे कुठून आले? असा सवाल ते उपस्थित करत आहेत.
माझे राजकीय गणित जुळलेले आहे, ते मी आता जाहीर करणार नाही, तुम्ही निकालापर्यंत वाट पहा, हा कृष्णा पाटील आष्टीकर यांचा आत्मविश्वास आहे की ओव्हर काॅन्फीडन्स? याचे उत्तर निवडणूकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. आतापर्यंत विधान परिषदेची निवडणूक अशोक चव्हाण होऊच देत नव्हते. बिनविरोधमुळे मतदारांना दुसरा पर्यायच नसायचा. आम्ही लढण्याची हिमंत दाखवली आहे. आता मतदारांमध्ये असलेला उद्रेक मतदानातून बाहेर पडेल, असा दावाही आष्टीकर पिता-पुत्रांनी केला आहे.
अशोक चव्हाणांनी धसका घेतला?
काँग्रेसच्या रामदास पाटील सुमठाणकर यांची ऐनवेळी उमेदवारीतून माघार, नागेश पाटील आष्टीकरांची वाढती सक्रियता, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये असलेली सुप्त नाराजी याचा खासदार अशोक चव्हाण यांनी धसका घेतला नाही. स्थानिक पातळीवर मित्रपक्षाचे नेते ऐकणार नाहीत, हे लक्षात आल्यावर त्यांनी एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडून स्थानिक नेत्यांना महायुती आणि युतीधर्माची आठवण करून देत अमर राजूरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे निरोप दिले आहेत.
एकीकडे हे प्रयत्न सुरू असतानाच महायुतीच्या मतदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याचीही माहिती आहे. 18 जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. तोपर्यंत आपले मतदार सुरक्षित राहावेत यासाठी दोनशेहून अधिक जणांना गोव्याला सहलीवर पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. या सगळ्यांना थेट मतदानाच्या दिवशीच नांदेडमध्ये आणण्यात येणार आहे, असे सांगीतले जाते.
वंचितमुळे डोकेदुखी?
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रशांत इंगोले यांच्या उमेदवारीने दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढवली. कागदावरील आकडेवारीत महायुती वाघ आहे, महाविकास आघाडी मॅजिक फिगरच्या आसपासही नाही, मात्र ती मॅजिक फिगर आपल्याकडे असलेला त्यांचा दावा, अशोक चव्हाण यांना निवडणूक सोपी नाही, हे दाखवून देणारा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळणार एवढे मात्र निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.