

MLC Election : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे समर्थक माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यानंतर पक्षात पुन्हा निष्ठावंत विरुद्ध नव्याने पक्षात दाखल झालेले असा वाद सुरू झाला आहे. एकीकडे राजूरकर यांच्या उमेदवारीने भाजपामध्ये पक्षांतर्ग कुरबुरी सुरू आहेत. तर दुसरीकडे महायुती असून मित्रपक्षांना कसपटासमान लेखण्याच्या अशोक चव्हाणांच्या वृत्तीवर शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते संतापले आहेत.
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीपासून सुरू असलेला हा सिलसिला आता नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतही सुरूच आहे. अशोक चव्हाण यांनी राजूरकर यांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखायला सुरूवात केली आहे. महायुतीकडून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर या मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते असे बोलले जाते.
महायुती म्हणायचे आणि मित्रपक्षांनाच डावलायचे अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही, अशी नाराजी या दोन्ही नेत्यांनी बोलून दाखवली. याच दरम्यान, हेमंत पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात दीड तास गुप्त बैठकही झाल्याने अशोक चव्हाण यांची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण हे महायुतीतील या तानातानीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
भाजपामध्ये सगळेच काही अलबेल नाही, अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून या पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. या नाराजीचा फायदा निश्चित काँग्रेस महाविकास आघाडीला होईल, असा दावा नांदेडचे काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. हेमंत पाटील यांनीही त्यांचीच री ओढली.
दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी जशी अमरनाथ राजूकर यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणली तशीच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतली आहे. विरोधक आणि महायुतीतील मित्रपक्षातील नेत्यांच्या नाराजीला फारसे महत्व न देता अशोक चव्हाण यांनी मतदारांशी संवाद साधत तयारी सुरू केली आहे.
आमच्यासोबत महायुतीचे स्थानिक नेते, काही आमदार मुंबईला गेल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी अर्ज दाखल करताना होते. अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारीचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे केवळ महायुतीच नाही तर काही अदृश्य आणि सदृश हात देखील असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.
महापालिकेप्रमाणेच नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही अशोक चव्हाण मित्रपक्षांच्या भरवशावर न राहता आत्मनिर्भर होत निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहेत. आता शिवसेना-राष्ट्रवादीतील नाराजी मतांमधून बाहेर येते का? त्याचा फायदा महाविकास आघाडीला होतो का? की अशोक चव्हाण या सगळ्यावर मात करून स्वतःच्या हिंमतीवर ही जागा निवडून आणतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.