Nanded Politics : महापालिकेत आपल्या मुलाला पद मिळावे या हेतून आणि स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजपसोबत युती केल्याची तोफ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांनी डागली. शिवसेनेने भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना आपल्या चार नगरसेवरकांना बिनशर्त पाठिंबा दर्शवला. यानंतर शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.
दुसरीकडे बालाजी कल्याणकर यांनी मात्र पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा जाहीर करण्याचे आदेश दिल्याचा दावा केला आहे. तसेच आमदार आनंद बोंढारकर यांनीही भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे दुरध्वनीवरून सांगितल्याचे आमदार कल्याणकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. परंतु ते पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.
नांदेड-वाघाळा महापालिकेत जिल्ह्यातील शिवसेना आमदारांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले होते. आमदार हेमंत पाटील, आनंद बोंढारकर, बाबुराव कदम यांनी या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली होती. तर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेत आपल्या मतदारसंघातील प्रभागात उमेदवार दिले होते. शिवसेनेचे जे चार नगरसेवक निवडून आले आहेत, ते त्यांच्याच प्रभागातील असल्याचे बोलले जाते. या चारही नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
निवडणुकांपूर्वी महायुतीसाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. आता उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार भाजपने नांदेड महापालिकेत शिंदेसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी अॅड. महेश कनकदंडे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली असून तशी नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. महापालिकेअंतर्गत रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासनाला स्थैर्य मिळावे यासाठी स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे. आता महापालिकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर असेल. त्यामुळे शहरातील रखडलेली विकासकामे वेगाने पूर्ण करणे शक्य होईल. शिवसेनेच्या चारही नगरसेवकांनी विनाअट पाठिंबा दिल्याने महायुतीचे संख्याबळ 45 वरून 49 झाले असून सत्ता अधिक मजबूत झाली असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगीतले. तर आमदार आनंद बोंढारकर यांनीही दूरध्वनीद्वारे महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी महापालिकेत मुलाला पद देण्यासाठी भापजसोबत युती केल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनय गिरडे यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कल्याणकर यांनी पराभूत झालेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याचे गिरडे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.