Sharad Pawar, Nanded Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar Politics : ना पक्ष, ना चिन्ह, काळ कसोटीचा; तरीही 'सिर्फ नाम ही काफी हैं'

Nanded NCP : नांदेड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा उभारण्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर आव्हान

Laxmikant Mule

Nanded Political News :

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटासाठी आगामी काळ हा कसोटीचा आहे. पक्षाच्या विस्तारासाठी खडतर परिस्थितीतून मार्ग काढावा लागणार आहे. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. शरद पवार म्हणतील तोच आमचा पक्ष आणि चिन्ह, अशी भूमिका घेत कार्यकर्ते आणि समर्थकांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) मोर्चा काढून महायुती सरकारचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले, तर काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून अन्य पक्षांची वाट धरली. नांदेड जिल्ह्यात माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी आमदार प्रदीप नाईक, हरिहराव भोसीकर, शिरीष देशमुख गोरठेकर आदी पदाधिकारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सात महिन्यांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विभागले गेले. आता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा (Ajit Pawar) झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शरद पवार समर्थकांना चिन्ह आणि पक्षाचे नाव नसताना पक्षाचे काम करावे लागणार आहे. हा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी खऱ्या अर्थाने कसोटीचा काळ असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड जिल्ह्यातील, कंधार, नायगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची नांदेड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत नाजूक स्थिती झाली आहे. त्यातच पक्षफुटीचा आघात झाला आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत, पण येणाऱ्या काळात या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची कसोटी लागणार आहे

जिल्ह्यात सध्या शरद पवारांचा एकही आमदार नाही. स्थापन केलेला पक्ष आणि चिन्हही नाही. अशा बिकट परिस्थितीतून मार्ग काढत पक्षाचा विस्तार करावा लागणार आहे. नवा पक्ष, नवे चिन्ह घेऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. एवढे मात्र खरे की काळ कसोटीचा असला तरी 'शरद पवार सिर्फ नाम ही काफी हैं!'

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT