Hemant Patil-Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar News Sarkarnama
मराठवाडा

Pratap Patil chikhalikar v/s Ashok Chavan : साखर कारखान्याचे बॉयलर पेटण्याआधीच नांदेड जिल्ह्यात राजकीय भडका!अशोक चव्हाण यांना घेरले

Pratap Patil Chikhlikar Political Attack On Ashok Chavan :अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील किती कारखाने बंद पाडले, स्वतःचा भाऊराव सहकारी साखर कारखाना तोट्यात का जातो?, दरवर्षी शासनाकडून शंभर- दीडशे कोटी रुपये का घ्यावे? लागतात..

Jagdish Pansare

  1. नांदेडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अशोक चव्हाण यांच्यावर मित्रपक्षांचे नेतेच टीका करत आहेत.

  2. प्रताप पाटील चिखलीकर आणि हेमंत पाटील यांनी चव्हाणांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले.

  3. या आरोप-प्रत्यारोपांमुळे नांदेडमधील भाजप आणि मित्रपक्षांमधील मतभेद उघडकीस आले आहेत.

Nanded Political News : विधानसभा निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमध्येच छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू होत्या. विरोधक तर विरोधक पण महायुतीतील मित्रपक्षांनीही अशोक चव्हाण यांना टार्गेट केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. चव्हाण यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी आणि विरोधक असलेले प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेना आमदार हेमंत पाटील ही जोडी सध्या अशोक चव्हाण यांच्यावर तुटून पडली आहे. विशेषत: प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने अद्यापही जाहीर न केलेल्या भावावरून टीकास्त्र सोडले आहे.

लातूरच्या देशमुखांकडून यशस्वीपणे चालवल्या जाणाऱ्या मांजरा साखर उद्योग समूहाशी तुलना करू पाहणाऱ्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3551 रुपये भाव द्यावा, ते देशमुख यांची बरोबरी कधीच करू शकत नाही, असा टोला चिखलीकर यांनी एका कार्यक्रमात लगावला. यावर अशोक चव्हाण यांनी कलंबर कारखाना सुरू करा म्हणावं, अशा मोजक्या शब्दात चिखलीकरांवर पलटवार केला. झालं या वादातून चव्हाण विरुद्ध चिखलीकर संघर्षाची ठिणगी पडली.

अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील किती कारखाने बंद पाडले, स्वतःचा भाऊराव सहकारी साखर कारखाना तोट्यात का जातो?, दरवर्षी शासनाकडून शंभर- दीडशे कोटी रुपये का घ्यावे? लागतात याचे उत्तर अशोक चव्हाण यांनी द्यावे. सत्ताधारी पक्षातील त्यांचा प्रवेशच या कारणांमुळे झाला आहे. कलंबर कारखाना मी सुरू करणारच, तेवढी धमक माझ्यात आहे, असे प्रताप पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhlikar) म्हणाले.

तुम्ही फक्त मांजरा साखर कारखान्याने दिला त्यापेक्षा एक रुपयाचा अधिक भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करून दाखवा, असे आव्हान चिखलीकर यांनी दिले. जिल्ह्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांचे खापर शेवटच्या काळात मी ज्या कारखान्याचा चेअरमन होतो म्हणून जर माझ्यावर फोडत असाल तर इतर कारखान्यांचे पाप तुमचे आहे, असा थेट आरोप प्रताप चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला.

शिवसेनेकडून रावणाची उपमा

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध दंड थोपटले असताना दुसरीकडे शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार हेमंत पाटील यांनीही अशोक चव्हाण यांनाच टार्गेट केले आहे. नांदेड शहरातील रावण दहन कार्यक्रमात शहरातील अरुंद रस्ते यावरून मोक्याच्या जागा बिल्डरच्या घशात घालून शहराचा बट्ट्याबोळ कोणी केला? असा सवाल करत जनता अशा रावणाचा नाश करेल अशी, विखारी टीका हेमंत पाटील यांनी केली होती.

यापूर्वीही अशोक चव्हाण यांचे थेट नाव न घेता 'अशोकाचे झाड हे दुसऱ्याला सावली देऊ शकत नाही, ते स्वतःच मोठे होते आणि स्वतः सावली घेते, असा टोला हेमंत पाटील यांनी लगावला होता. एकूणच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढलेले जिल्ह्यातील नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र युती गुंडाळून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसतात.

प्रत्येकाला आपले वर्चस्व, राजकीय ताकद आणि अस्तित्व टिकवायचे असल्याने मित्रपक्ष असले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी जिल्ह्यातील नेते आता शोधू लागले आहेत. अशोक चव्हाण यांनी अद्याप तरी उघडपणे मित्र पक्षातील लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांना अंगावर घेतलेले नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष प्रामुख्याने अशोक चव्हाण यांच्या विरोधात आगामी निवडणुकीत रान पेटवणार आहे. अशावेळी मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांचा उपद्रव नको, या भूमिकेतून अशोक चव्हाण यांची भूमिका सध्या 'वेट अँड वॉच' ची असल्याचे दिसते.

FAQs

1. नांदेडमध्ये नेमकं काय घडलं आहे?
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात मित्रपक्षातील नेतेच टीका करत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

2. कोणत्या नेत्यांनी टीका केली आहे?
प्रताप पाटील चिखलीकर आणि हेमंत पाटील यांनी चव्हाणांविरोधात वक्तव्ये केली आहेत.

3. अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे?
चव्हाण यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.

4. याचा काँग्रेसवर काय परिणाम होईल?
मित्रपक्षांशी मतभेद वाढल्याने भाजपला नांदेडमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

5. पुढील निवडणुकीवर याचा परिणाम होईल का?
होय, स्थानिक पातळीवरील मतसंघटन आणि गठबंधनांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT